आठ वर्षीय बालिकेचा मृतदेह कडब्याच्या गंजीत लपवून त्याची विल्हेवाट लावण्याचा त्याचा प्रयत्न होता. पण घटनेनंतर तिन्ही दिवस संपूर्ण गाव जागे होते अन पोलिसांनी साध्या वेशातील लावलेला पहारा, पारावर होणाऱ्या गप्पा यातून दुवा मिळाला अन त्यांनी आरोपी स्वप्नील पाटील याला बोलते केले.
जळगाव -गोंडगाव (ता. भडगाव) येथील आठवर्षीय बालिकेवर अत्याचाराचा प्रयत्न करीत पीडितेने ओरडू नये म्हणून तिचे तोंड दाबत दगडाने डोकं ठेचून तिचा खून केल्याची कबुली नराधम स्वप्नील पाटील याने अखेर चौथ्या दिवशी आज पोलिसांसमोर दिली. ( Jalgaon Crime News)
गोंडेगावात आठवर्षीय बालिका बेपत्ता झाल्याची घटना रविवारी (ता. ३०) घडली होती. तिच्या कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेत शेवटी पोलिसांत हरविल्याची नोंद केली होती. गुन्ह्याचा शोध घेत असताना भडगाव पोलिसांसह गुन्हेशाखाही प्रयत्नांची पराकाष्ठा करीत होती.चौथ्या दिवशी गावातीलच विनोद पाटील यांच्या खळ्यातून उग्रदर्प येऊ लागल्याने कडबा उचलत असताना पीडितेचा मृतदेहच बाहेर आल्याने गावात एकच खळबळ उडाली. खळ्याच्या मालकाची चौकशी केल्यावर विनोद पाटील यांचा मुलगा स्वप्नील पाटील याला ताब्यात घेण्यात आले.
आठ वर्षीय बालिकेचा मृतदेह कडब्याच्या गंजीत लपवून त्याची विल्हेवाट लावण्याचा त्याचा प्रयत्न होता. पण घटनेनंतर तिन्ही दिवस संपूर्ण गाव जागे होते अन पोलिसांनी साध्या वेशातील लावलेला पहारा, पारावर होणाऱ्या गप्पा यातून दुवा मिळाला अन त्यांनी आरोपीला बोलते केले. त्याला अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, त्याला आज घटनास्थळी आणले असता ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त करीत त्याला आपल्या ताब्यात देण्याची मागणी केल्याने काही काळ गावात तणाव निर्माण झाला होता.
सलग दोन दिवस चौकशी करूनही तो गुन्ह्याची कबुली देत नसल्याने पोलिसांनी घडलेल्या गुन्ह्याची स्टोरीच त्याच्यापुढे सादर केल्याने तो घडाघडा बोलू लागला अन गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी गुरुवारी (ता. ३) माध्यमांना दिली.
महिन्यापूर्वी छेड चिमुकलीची तक्रार मोठ्या भावासारखा म्हणून सोडलं पण त्यानेच घेतला जीव…..
पीडितेने एक महिन्यापूर्वी संशयित सोनू ऊर्फ स्वप्नीलची तक्रार वडिलांकडे केली होती. तेव्हा वडिलांनी घडल्या प्रकाराबाबत स्वप्नीलच्या आई-वडिलांना सांगत त्याला खडसावले होते.
ती आठ वर्षांची अन स्वप्नील १९ वर्षांचा असे वयाचे अंतर असल्याने वाईट कृत्याच्या विचारानेही पीडितेच्या कुटुंबीयांच्या मनाला स्पर्श केला नाही. सोनू मोठ्या भावासारखा आहे. चिडवलं असेल म्हणून ते प्रकरण तिथेच शांत झाले. मात्र, वासनांध स्वप्नीलने अखेर पीडितेचा जीव घेतलाच.
ग्रामस्थांचा पोलिसांवरच रोष…
पीडिता बेपत्ता झाल्यापासून ग्रामस्थ अस्वस्थच होते. चौथ्या दिवशी कुजलेल्या स्थितीत मृतदेह हाती लागल्यावर मात्र ग्रामस्थांचा संताप अनावर होऊन त्यांनी थेट पोलिस अधिकाऱ्यांवरच प्रश्नोत्तरांची सरबत्ती केली.
गावातील नागरिक आपसांत नातेवाईक आहेत. सदर प्रकरणी ग्रामस्थांचा संताप होत होता. गुन्हेगाराला अटक न झाल्यास ग्रामस्थांनी जोरदार रोष व्यक्त करत तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता वर्तवली जात होती. गुन्ह्याची गंभीरता पाहता पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, निरीक्षक किशन पाटील यांनी अतिरिक्त माहिती साध्या वेशातील पोलिसांना संकलित करण्याच्या सूचना दिल्या होत्या. अन् तिथेच संशयिताचा अंदाज पोलिसांना आला होता.
पोलिसांची अचूक माहिती आणि त्याने तोंड उघडले –
पोलिसांच्या गावातील येरझाऱ्या, रात्री कट्ट्यावर बसणाऱ्या गावकऱ्यांची चर्चा यातून संशयित सोनू ऊर्फ स्वप्नील विनोद पाटील हा अतिरिक्त सावधगिरीने राहत होता.
माहिती मात्र सर्वच बाजूंनी संकलित केली जात असल्याने पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर त्याचा पाहुणचार करूनही तो गावकऱ्यांच्या भीतीने बोलत नव्हता.
परिस्थितीजन्य पुरावे आणि पार्श्वभूमी पाहता वरिष्ठ निरीक्षक किशन पाटील यांनी दोन दिवस वाट पाहून तिसऱ्या दिवशी घडलेल्या घटनेचे कथानकच स्वप्नीलला सांगितले.तू गुन्हा कसा केला, त्यात कोण-कोण सहभागी आहे, आता तुझ्या आई-वडिलांनाही अटक करावी लागेल, असे सांगताच स्वप्नीलने तोंड उघडले.
असा घडला अपराध – पीडितेने तिची स्वप्नील छेडखानी करीत असल्याची तक्रार वडिलांकडे केली होती. स्वप्नीलच्याच खळ्यात पीडितेला बोलावून त्याने अत्याचार केला. पीडिता आपले नाव गावात सांगेल, या भीतीने स्वप्नीलने तिचे तोंड दाबत दगडाने डोक्यावर मार केल्याने ती शांत झाली.
कुणाचेही लक्ष नाही म्हणून त्याने कडब्याच्या गंजीत मृतदेह दडवून ठेवला होता. रात्रीच्या अंधारात इतरत्र कुठेतरी मृतदेह फेकून येऊ, अशा प्रयत्नात तो होता. मात्र, रात्र-रात्रभर संपूर्ण गाव या घटनेमुळे जागेच राहत असल्याने त्याला मृतदेह हलविता आला नाही. अखेर तिसऱ्या दिवशी कडब्यातून उग्रदर्प येत असल्याने त्याचे बिंग फुटले.
या गुन्ह्याचा तपास जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, रमेश चोपडे, सहाय्यक पोलिस अधीक्षक अभयसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किसन पाटील यांच्या पथकातील उपनिरीक्षक गणेश वाघमारे, गणेश चोभे, विजयसिंह पाटील, सुधाकर अंभोरे, विजय पाटील, लक्ष्मण पाटील, प्रीतम पाटील, अकरम शेख, किशोर राठोड, ईश्वर पाटील, किरण चौधरी, हेमंत पाटील अशांच्या पथकाने अहोरात्र मेहनत घेत गुन्हा उघडकीस आणला.