छत्रपती संभाजीनगर – छत्रपती संभाजीनगरच्या सोयगावमध्ये मुलीच्या मृत्यूनंतर वडिलांनीही आपलं आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पैशाअभावी मुलीवर उपचार करता न आल्याने तिचा मृत्यू झाला. यामुळे खचलेल्या बापाने मुलीवर अंत्यसंस्कार केल्यानंतर काही तासातच गळफास घेऊन आत्महत्या केलीय. सोयगावात बापलेकीच्या अशा मृत्यूने हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, नातेवाईकांनी मुलीच्या वडिलांचा मृतदेह नगरपंचायतीसमोर तसाच ठेवला. नगर पंचायतीत ते कामाला होते. त्यांना निलंबित केल्यानं त्यांच्यावर अशी वेळ ओढावल्याचा आरोप नातेवाईकांनी केला.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, सोयगाव नगरपंचायतचे पाणीपुरवठा कर्मचारी दीपक राऊत यांना तीन महिन्यापूर्वी निलंबित केलं होतं. कोणतीही सूचना न देता दीपक राऊत यांच्यावर कारवाई झाली होती. त्यांचे वेतनही रोखून ठेवण्यात आले होते. त्यातच मृत दीपक राऊत यांच्या १९ वर्षीय मुलीवर पैशाअभावी उपचार न झाल्याने मृत्यू झाला.
मुलीचा पैशाअभावी मृत्यू झाल्याने आणि योग्य वेळी उपचारासाठी पैसा उपलब्ध करू न शकल्याने दीपक राऊत यांना धक्का बसला. शेवटी मनस्ताप सहन न झाल्याने त्यांनी मुलीवर अंत्ययसंस्कार केल्यानंतर रात्री २ वाजता घरात गळपास घेऊन आत्महत्या केली. कुटूंबीय आणि नातेवाईकांनी आक्रोश करत दीपक राऊत यांचे प्रेत नागरपंचायतसमोर आणून ठेवले. जो पर्यत दीपक राऊत यांना न्याय मिळत नाही आणि संबंधित नगर पंचायत मुख्यधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी नातेवाईकांनी केलीय.काही तासातच बाप लेकीच्या एकापाठोपाठ मृत्यूने तालुका हळहळला.