Thursday, November 21, 2024
Homeताज्या बातम्यादुपारी स्फोटाचा भयानक आवाज.. उंचच उंच आगीच्या ज्वाळा टोरंट गॅस पाईप लाईनला...

दुपारी स्फोटाचा भयानक आवाज.. उंचच उंच आगीच्या ज्वाळा टोरंट गॅस पाईप लाईनला भीषण आग…. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

 लग्नघरासह वस्ती व परिसरात भीतीचे वातावरण,नागरिकांची पळापळ 

कोरेगाव भिमा – सणसवाडी – तळेगाव ढमढेरे  (ता. शिरूर) गावांच्या हद्दिजवळ  भुजबळ वस्ती (शेणाचा मळा ) रस्त्यालगत जमिनीखालील टोरंट गॅस पाईपलाईन येथे स्फोटाच्या आवाजाने व लागलेल्या भीषण आगीमुळे परिसरामध्ये भीतीचे वातावरण तयार झाले होते. आगीची धग सुमारे  सत्तर ते ऐंशी फुटांवर लागत असल्याने येथील महिला भगिनी व लहान मुले यांच्यासह नागरिकांच्या मनात भीतीयुक्त दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. येथील महिला भगिनींनी मदत अर्धा ते पाऊण तासाने मिळाल्याचे सांगितले तर कंपनीच्या वतीने पंधरा मिनिटांमध्ये मदत केल्याचे सांगितले.

येथील एकनाथ भुजबळ यांच्या मुलाचे लग्न काल झाले. लग्नघरामध्ये पाहुण्यांच्या गप्पागोष्टी सुरू होत्या आणि अचानक दुपारी सव्वा एक ते एकवाजून वीस मिनिटांनी स्फोटाचा भयानक आवाज झाला आगीच्या पन्नास ते साठ फूट उंचच उंच ज्वाळा दिसू लागल्या सर्व लग्न घरातील मंडळी घाबरली पळापळ सुरू झाली सर्वजण घर सोडून लांब पळाले यावेळी घरापासून लांब थांबून नागरिकांनी जीवाचे रक्षण करत व्हिडिओ काढला. पाऊण ते एक तास नागरिकांनी आगीच्या ज्वाळा पहिल्या त्यानंतर टोरंट गॅस कंपनीचे अधिकारी मदतीस आल्याने नागरिकांनी नाराज व्यक्त केली.यावेळी शिक्रापूर पोलीस स्टेशन कर्मचाऱ्यांनी तातडीने मदत केली.

      टोरंट गॅस कंपनीचे अधिकारी वेगवेगळी उत्तरे देत असून आगीची वेगवेगळी कारणे सांगत आहेत. याबाबत आग लागल्यावर भीतीदायक परिस्थितीत टोरंट गॅस कंपनीशी संपर्क करायचा तर नंबर नाही, कंपनीचे अग्निशमन दल,आग नियंत्रण पथक नाही यामुळे टोरंट गॅस पाईप लाईन बाबत नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण तयार झाले असून या गॅस पाईप लाईन विषयी महिला भगिनी खूप घाबरल्या आहेत.

दुपारी सव्वाएकच्या स्फोटाचा आवाज झाला व भीषण आग लागली पन्नास ते साथ फूट उंच आगीच्या ज्वाळा होत्या तसेच सत्तर ते ऐंशी फूट धग होती. आम्ही खूप घाबरलो या पाईप लाईनमुळे एखाद्याचा जीव जाऊ शकतो या गॅसचा आम्हाला उपयोग नाही.इथे कोणी घेतला नाही आणि कोणी घेणार पण नाही असा धोका असल्यावर त्या जागी गॅस पाईप लाईनला आग लागण्यापूर्वी तिथे कसलीही आग वैगेरे काही सुरू नव्हते. – स्थानिक शेतकरी एकनाथ भुजबळ

सदर ठिकाणी आग लागल्याची माहिती मिळताच पंधरा मिनिटांमध्ये मदत पोचली, आगीचे कारण शोधत आहोत, दोनशे मीटरवर गॅस पाईप वॉल आहे तो बंद केला यापुढे अशा घटना घडणार नाहीत याची काळजी घेऊ .- मिलिंद नरहरशेट्टिवार , टोरंट गॅस पुणे जिल्हा अधिकारी 

  टोरंट गॅस पाईप लाईनला आग लागणे ही अत्यंत गंभीर घटना असून टोरंट गॅस कंपनीचे काम तातडीने थांबवण्यात  यावे, नागरिकांच्या सुरक्षिततेला पूर्ण प्राधान्य देण्यात येऊन सदर कंपनीवर फौजदारी दाखल करण्यासाठी गावपातळीवर चर्चा करून कायदेशीर सल्ला घेऊन पुढील निर्णय घेणार – सरपंच सुवर्णा रामदास दरेकर

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!