Thursday, November 21, 2024
Homeसाहित्य/सामाजिकचला व्यक्त होऊ या?जीवनातील राम शोधण्यास मदत करणारे आप्पासाहेब धर्माधिकारी...

जीवनातील राम शोधण्यास मदत करणारे आप्पासाहेब धर्माधिकारी…

श्री समर्थ आध्यात्मिक प्रासादिक सेवा समिती रेवदंडा अलिबाग’ येथून आप्पासाहेब यांनी आपल्या कार्यातून तळागाळातील प्रत्येक मनुष्यासाठी, समाजाच्या सेवेसाठी आप्पासाहेबांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले आहे. श्री सदस्यांवर आलेल्या प्रसंगांमध्ये त्यांना मानसिक ,अध्यात्मिक स्थिरता देऊन उभे करणे, तसेच त्यांना योग्य मार्गदर्शन करणे हे आप्पासाहेबांनी महत्वपूर्ण दिशादर्शक व सामाजिक उत्थानाचे कार्य केले.सर्वसामान्य माणसांना जीवनातील राम शोधन्यासाठी मार्गदर्शन व मदत करणारे आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे कार्य अनमोल व दिशादर्शक आहे

आप्पासाहेबांच्या ओजस्वी वाणीतून मौखिक निरूपण श्रवण केल्याने माणसाच्या अंतरंगात आमूलाग्र बदल होतो, निरुपणाचा प्रसाद मिळाला, तर दुग्धशर्करा योग जुळून येतो.ज्यांना आयुष्यात आप्पासाहेब यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले, त्यांना जगण्याची योग्य दिशा मिळते.कुटुंब,समाज,देशप्रेम यांच्यासह जगण्यातील सत्व शिलता बहरते श्री परिवार सदस्य म्हणजे सामाजिक कार्यातील एक आगळा वेगळा घटक समाजासमोर दिसतो.

नानासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने काही वर्षांपूर्वी गौरवल्यानंतर त्यांचे सुपुत्र अप्पासाहेब धर्माधिकारी यांना पद्मश्री पुरस्कारानंतर महाराष्ट्र सरकारच्या ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. वडील आणि मुलाला असा एकच मोठा सन्मान दिला जाण्याचे हे बहुधा एकमेव उदाहरण असावे. खरेतर, देशभरातील लाखो श्री सदस्यांच्या कार्याचा हा गौरव आहे.आज माणूस माणसापासून दुरावत असताना, माणुसकी,निसर्ग, समाजभान हरवत चालल्याची जाणीव होताना समाजातील असहिष्णुता वाढत असताना त्यावर केवळ पोकळ बाता मारण्यापेक्षा ‘आधी केलेचि पाहिजे’ या उक्तीप्रमाणे सातत्याने कार्यतत्पर राहून समाजाला वेगळी दिशा देण्याचे काम श्री सदस्यांची बैठक चळवळ करीत आहे.

आप्पासाहेबांनी आपल्या मितभाषी, शालीन, सुसंस्कृत, मृदू, सत्वशील व सत्यवचनी स्वभावातून समाजमनाला सामाजिक चळवळीचा नवीन, ताकदवान आयाम दिला. अप्पासाहेबांनी बदलत्या पर्यावरणाचे स्वरूप लक्षात घेऊन वृक्षलागवड, वृक्षसंगोपन, स्वच्छता अभियान ही अभिनव चळवळ सुरु केली. गेल्या दोन दशकांमध्ये महाराष्ट्रात अनेक राजकीय कार्यक्रमांतून वृक्षलागवड केली गेली.यामध्ये निसर्गप्रेम,समाजभान व निस्सीम देशसेवा असल्याने निव्वळ जाहिरातबाजी,दिखाऊपणा व श्रेयवाद नसल्याने निस्पृह व निरपेक्ष कामामुळे अनेक झाडे फुलली बहरली निसर्ग सौंदर्य बहरले.झाडे लावायची आणि ती जगवायची हा कटाक्ष असल्याने अप्पासाहेबांनी वृक्षलागवडीबरोबरच वृक्षसंगोपनाला महत्त्व दिले. त्यांच्या प्रेरणेतून लाखो श्री सदस्यांनी जाहिरात, फोटोबाजी न करता लक्षावधी वृक्षांची लागवड केली आणि त्यांचे संगोपन केले. ते आजही चालू आहे. रोपे लावण्यासाठी अंगिकारलेली पद्धत शास्त्रशुद्ध असल्याने ९० टक्के झाडे वाढत आहेत. आज वृक्ष लागवडीच्या ठिकाणांची सूची, त्यांच्या संगोपनाचं वेळापत्रक त्यासाठी प्रत्येक श्री सदस्याची जबाबदारी यातून मोठी चळवळ उभी राहिली आहे.

सरकारने कोट्यवधी रुपये खर्चून जे काम होत नाही, ते अप्पासाहेबांच्या एका हाकेने सहज शक्य होते. याचे कारण दासबोधी शिकवण श्री सदस्यांच्या नसानसात भिनली आहे. परमार्थ म्हणजे होमहवन, मोठे यज्ञ, पारायणे, प्रवचन असे नसून परमार्थाची शिकवण आचरणातून दिसली पाहिजे, हा अप्पासाहेबांचा आग्रह असतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘स्वच्छ भारत’च्या हाकेला अप्पासाहेबांनी साथ दिली. लाखो श्री सदस्य राज्याच्या कानाकोपऱ्यात स्वच्छतादूत म्हणून काम करू लागले. ज्या परिसरात हा उपक्रम झाला, तिथे त्या त्या विभागाचा चेहरामोहराच पालटला. एकावेळी पाचशे श्री सदस्य काम करत असले तरी काही गडबड, गोंधळ नाही. या चळवळीला कोणी मुकादम नाही. रस्ता झाडताना आपला पेशा, दर्जा विसरायला लावणं, समाजाचा घटक व सेवाभावी वृत्तीने झोकून देत काम करणे ही बैठक चळवळीची सत्यनिष्ठ वैचारिक शिदोरी आहे.देवळात जाण्याइतकेच ज्या निरुपणातून आपण बोध घेतो तो आचरणात आणला पाहिजे, हे श्रीसदस्य शिकतात. त्यांना सामाजिक प्रश्नांची उकल करण्याचं सामर्थ्य अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी दिलं.

समृद्धी कायम भीतीने ग्रासलेली असते. हे वैफल्य न येण्यासाठी आपले वर्तन बदलणे महत्त्वाचे असते. ते मनाच्या बदलातून होते. असा बदल श्री परिवारात दासबोध शिकवणीतून होतो. बैठक चळवळीत प्रत्येक गोष्टीला स्वयंशिस्त आहे. त्याला वेळापत्रक आहे. प्रत्येक काम देशासाठी, स्वधर्मासाठी आहे, अशी स्वजाणीव प्रत्येक श्री सदस्यापाशी आहे. हे करताना त्याला स्वार्थाचा, अहंकाराचा अभिनिवेश नसतो. देश वेगाने प्रगत होत असताना सत्यविचारी आणि देशावर अपंरपार प्रेम करणाऱ्या समाजमनाचीही गरज आहे. असे परिपक्व समाजमन श्री सदस्यांच्या बैठक चळवळीतूनच उभं राहू शकतं. म्हणूनच अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या कार्याने या देशावर, धर्मावर वअंधश्रद्धाविरहित भक्तीवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक श्री सदस्याचा अनेक सामाजिक उपक्रमात अनमोल वाटा आहे.कार्याची व्याप्ती वाढलीश्री समर्थ बैठकातून संत शिकवण देतानाच नैतिकता, निर्भयता, नम्रतेची शिकवण त्यांनी दिली.

सामाजिक कार्याची व्यापकता वाढविण्यासाठी अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा या संस्थेची स्थापना केली. संस्थेच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबविले जाऊ लागले. लोकसहभागातून हे उपक्रम राबविले जाऊ लागल्याने त्यांची व्याप्ती वाढत गेली.

वृक्ष लागवड – हवामानात बदल आणि त्याचे तापमानावर होणारे परिणाम लक्षात घेऊन वृक्षलागवड करून त्यांची जोपासना करण्याचे कार्य नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने हाती घेण्यात आले. प्रतिष्ठानच्या वतीने २०१५ ते २०२१ या कालावधीत एकूण ३६ लाख ६१ हजार ६११ वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. ३ लाख २१ मनुष्यबळ वापरण्यात आले. या वृक्षांची जोपासनाही श्री सदस्यांकडून केली जात आहे.

स्वच्छता मोहीम – आंतरिक स्वच्छतेबरोबर परिसर स्वच्छतेला महत्त्व द्यायला हवे, अशी शिकवण अप्पासाहेबांनी आपल्या अनुयायांना दिली. या शिकवणीतून नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने स्वच्छता मोहिमेला सुरवात केली. रस्ते, नाले, गाळाने भरलेले तलाव, समुद्र किनारे यांची स्वच्छता करण्याचे कार्य श्री सदस्यांनी हाती घेतले. गावाच्या वेशीपासून सुरू झालेला हा उपक्रम हळुहळू शहरांच्या चौकाचौकांपर्यंत येऊन पोहोचला. प्रतिष्ठानच्या वतीने आत्तापर्यंत १४० स्वच्छता अभियाने राबविण्यात आली. २० लाख २३ हजार ३६९ श्री सदस्य सहभागी झाले. १ लाख १५ हजार २३ टन कचऱ्याचे संकलन करण्यात आले. या शिवाय विहिरीचे पुनर्भरण, जलस्रोतांची स्वच्छता, निर्माल्य संकलनातून खत निर्मितीचे उपक्रम राबविले आहेत. आध्यात्माला सामाजिक उपक्रमांची जोड दिल्याने लाखो अनुयायी त्यांच्या कार्यात जोडले गेले आहेत.

मिळालेले पुरस्कार – आप्पासाहेबांच्या या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना डी. वाय. पाटील विद्यापीठाने मानद डॉक्टरेट पदवी प्रदान केली. माजी राज्यपाल विद्यासागर राव यांनी त्यांची राज्याचे स्वच्छता दूत म्हणून नियुक्ती केली होती. तर २०१७ मध्ये केंद्र सरकारने पद्मश्री हा नागरी सन्मान देऊन सन्मानित केले. युरोपियन इंटरनॅशनल इन्स्टिट्युटने अप्पासाहेबांना लिव्हिंग लिजंड पुरस्कार देऊन सन्मानित केले. त्यांच्या आजवरच्या कारकिर्दीची दखल घेऊन राज्य सरकारने त्यांची महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित केले आहे.

  • १७ फेब्रुवारी २००४ : रायगड जिल्हा परिषदेतर्फे ‘रायगडभूषण पुरस्कार’
  • ११ डिसेंबर २००७ : समर्थ व्यासपीठ, पुणेतर्फे ‘शिव समर्थ पुरस्कार’
  • २००७ : खोपोली नगर परिषदेतर्फे ‘सन्मानपत्र (प्रमाणपत्र) पुरस्कार’
  • १७ फेब्रुवारी २००९ : सुराज्य फाउंडेशन, कोल्हापूरतर्फे ‘सुराज्य फाउंडेशन जीवनगौरव पुरस्कार’
  • २८ फेब्रुवारी २००९ : कै. फकीरभाई पानसरे प्रतिष्ठान, पुणेतर्फे ‘जगद््गुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज पुरस्कार’
  • ३१ मे २००९ : अलिबाग नगर परिषदेतर्फे ‘सामाजिक प्रबोधनात्मक मानपत्र’
  • १८ डिसेंबर २०११ : ठाणे महापालिकेतर्फे ‘सामाजिक प्रबोधनात्मक मानपत्र’
  • १ मार्च २०१२ : ग्रामपंचायत जांब (समर्थ) तर्फे ‘समर्थ रामदास स्वामी पुरस्कार’
  • १ जून २०१२ : पनवेल महानगरपालिकेतर्फे ‘सामाजिक प्रबोधनात्मक मानपत्र’
  • २० डिसेंबर २०१३ : ‘निदान, तपासणी, आरोग्य धड्यांवरील वैद्यकीय मार्गदर्शनाचा जागतिक विक्रम’
  • २०१४ : कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे संत साहित्याचे अभ्यासक आणि प्रचारक म्हणून विशेष सत्कार
  • ४ एप्रिल २०१४ : डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, नवी मुंबईतर्फे ‘डॉक्टर ऑफ लिटरेचर’ प्रदान
  • २०१७ : राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते ‘पद्मश्री’ने सन्मान
  • १६ एप्रिल २०२३ : राज्य सरकारतर्फे देण्यात येणारा ‘महाराष्ट्रभूषण पुरस्कार’
  • (आप्पासाहेब धर्माधिकारी यांना जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा…)
संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!