पुणे – पिंपरी- चिंचवडमध्ये पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर अज्ञात व्यक्तीने शाई फेकली ( Ink thrown on Minister Chandrakant Patil ) आहे. चंद्रकांत पाटील यांनी नुकतंच डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. यामुळे राज्यात विरोधक आक्रमक झाले होते. आज सकाळीच पिंपरी च्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात विविध पक्षांनी आंदोलन करून पाटील यांचा निषेध व्यक्त केला होता.
वादग्रस्त विधानाच्या पार्श्वभूमीवर संपुर्ण महाराष्ट्रातून संताप व्यक्त होत आहे. चिंचवडमधील श्रीमन महासाधू श्री मोरया गोसावी समाधी महोत्सव आजपासून सुरु होत आहे. त्याचे उद्घाटन पाटील यांच्या हस्ते होणार असल्याचे संयोजकांनी गुरुवारी जाहीर केले होते.दरम्यान, पाटील यांनी पैठण येथे केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे उद्घाटन कार्यक्रमस्थळी तणाव होता. ‘पाटील यांना शहरात पाउल ठेवू देणार नाही’, असा इशारा संभाजी ब्रिगेडने दिला होता.
या पार्श्वभूमीवर कार्यक्रमस्थळी प्रचंड पोलिस बंदोबस्त होता.उद्घाटनाच्या कार्यक्रमापूर्वी भाजपा कार्यकर्त्याच्या घरी चहापानासाठी गेले असता सहाच्या सुमारास घरातून जिन्याने उतरून खाली आलेल्या चंद्रकांत पाटील यांच्यावर काही क्षणात अचानक अज्ञाताने अंगावर शाई फेकली यामुळे मोठा गोंधळ उडाला. पोलिसांनी शाईफेक व घोषणा देणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शाई फेकनाऱ्याने डॉ बाबासाहेब बेडेकर ,महात्मा फुले यांच्या नावाने घोषणा दिल्या व चंद्रकांत पाटलांचा निषेध असो अशा घोषणा दिल्या यावेळी पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांचा तपास करण्यात येत आहे.
चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेक हल्ला झाल्यानंतर पोलीस आयुक्त अंकुश शिंदे तसेच इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील घटनास्थळी दाखल झाले.