शुक्रवारी रात्री स्वयंपाक करताना घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. या भीषण स्फोटात दोन जणांचा मृत्यू झाला. त्यात ३ वर्षीय बालकाचा समावेश आहे. तर पाच जण जखमी झाले आहे. स्फोटाने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
छत्रपती संभाजी नगर येथील किराडपुरा परिसरातील शरीफ कॉलनी भागात एका घरामध्ये शुक्रवारी (ता. तीन) रात्री साडेआठच्या सुमारास स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. यात सदफ इरफान शेख (वय तीन) ही चिमुकली जागीच ठार झाली, तर तिच्या कुटुंबातील इतर पाच जण भाजले.यापैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
शरीफ कॉलनीतील रोशन मशिदीजवळ इरफान शेख यांचे पत्र्याचे दोन खोल्यांचे घर आहे. शेख यांचा भंगारचा व्यवसाय आहे. या घरात इरफान शेख आणि त्यांचे दोन भाऊ राहतात. शुक्रवारी सायंकाळी घरात शेख रिजवानसह सात सदस्य होते. रात्री साडेआठला शेख यांच्या घरातून अचानक शेजाऱ्यांना मोठा आवाज आला. शेख यांच्या घरात त्यावेळी लहान मुलांसह रिझवान खान सत्तार खान होते.
आवाज आल्यानंतर शेजारी शेख यांच्या घराकडे धावले. यावेळी घरातून आगीचे लोळ बाहेर पडताना दिसले. काही वेळातच घरातील भंगार सामानानेही पेट घेतला. त्यामुळे आग मोठ्या प्रमाणात भडकली. नागरिकांनी तातडीने आपापल्या घरातून पाणी आणत मदतकार्य केले. आजूबाजूच्या घरांतून पाणी; तसेच तेथील एका इमारतीच्या बांधकामाच्या वाळूचा वापर करीत नागरिकांनी आग आटोक्यात आणण्यास मदत केली. अग्निशमन विभागाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न केले. तब्बल ४५ मिनिटे ही आग धगधगत होती.
या घटनेत सदफ ही चिमुकली ठार झाली, तर झिशान शेख (वय ९), रिझवान खान सत्तार खान (वय ४०), रेहान चाँद शेख (वय १७), फैजान रिझवान पठाण (वय १३), आदिल खान इरफान खान (वय १०) हे जखमी झाले आहेत.