गणपतीच्या माळावर पांडुरंगाच्या काकड आरतीने ग्रामस्थांची भक्तिमय व चैतन्यदायी दिवसाची सुरुवात
तळेगाव ढमढेरे प्रतिनिधी
गणपतीमाळ (ता.शिरूर) येथील गणपती मंदिरात ‘‘उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा’’ अशी पांडुरंगाला आर्त हाक देत मंगल आणि भक्तीमय वातावरणात या भागात काकड आरतीला सुरुवात झाली.
शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे, टाकळी भीमा, निमगाव म्हाळुंगी आणि कासारी या गावांतुन भक्तजन,भजनी मंडळी तळेगांव ढमढेरे न्हावरा रस्त्यालगत असणाऱ्या गणपती मंदिरात गेले अकरा वर्षांपासून नित्यनेमाने येत असतात. कोजागिरी पोर्णिमा झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सोमवारी पहाटेच्या सुमारास काकड आरतीला सुरुवात झाली. या दिवसांपासून सुरू असलेल्या पहाटेच्या धार्मिक कार्यक्रमांनी परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. सुरवातीपासून भक्तिमय वातावरणात वारकरी नित्याने पहाटे देवळात काकड आरतीला हजर राहून भजन, गवळणी, अभंग भक्तिरसात हरवून जात गात असतात. पहाटेच्या श्रींचा अभिषेक, मंदिरात पुष्पहारांची आकर्षक सजावट, अंगणात रांगोळी यामुळे येथील वातावरण भक्तिमय व प्रसन्न होऊन जाते. सर्वांच्या चेहऱ्यावर निस्वार्थ भक्ती दिसून येत असते.
गणपती माळ चार गावांच्या शिवेवर असलेल्या गणेश मंदिरामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते आरती घेतली जाते. त्रिपुरारी पौर्णिमेला काल्याच्या कीर्तनाने काकडा अरतीचा कार्यक्रम संपन्न होतो.