पवित्र श्रावण महिन्यात मोठ्या भक्तिभावाने दररोज केला जातो हरिपाठ
कोरेगाव भीमा – कोरेगाव भीमा ( ता.शिरूर) येथील श्री हनुमान मंदीरात पवित्र श्रावण मासानिमित्त नित्यनेमाने सायंकाळी हरिपाठ साजरा केला जय असून यामध्ये गावातील अबालवृद्ध सहभागी होत असतात.
सायंकाळी सहाला श्री विठ्ठल रुक्मिणी,श्रीराम व मारुती मंदिरात हरिपाठाला सुरुवात होते आणि संताच्या अभंगातून जीवनाविषयी तत्वज्ञान आपोआप अभगांच्या रूपातून जनमानसांच्या कानी पडते आणि आपोआप संत विचार प्रसारित होत संस्कार घडत जातात. हे ग्रामीण भागातील श्रावण मासातील दिसणारे चित्र.
भावेंवीण भक्ति भक्तिवीण मुक्ति ।बळेंवीण शक्ति बोलूं नये ॥
कैसेनि दैवत प्रसन्न त्वरित ।उगा राहें निवांत शिणसी वायां ॥
या अभंगातून जन्ममृत्युरूप संसारदुःखापासून एक हरीच सोडविणारा आहे, असा दृढ विश्वास असल्यावांचून हरीवर आत्यंतिक म्हणजे निःसीम प्रेम बसणार नाही, व अशा निःसीम भक्तीवांचून संसारांतून मुक्तता केव्हांही होणार नाही असा नियम आहे. ह्यास्तव हरीच्या ठिकाणीं भाव असल्यावांचून भक्ति होईल व भक्तीवांचून मुक्ति मिळेल असें जे म्हणतात त्यांचे तें म्हणणें आपल्या अंगांत कांही एक बळ नसतांना मी अमूक एक शक्तीची गोष्ट करीन असें म्हणण्याप्रमाणें व्यर्थ होय, म्हणून तसें बोलूं नयेदेव लवकर कशानें प्रसन्न होईल असा जर तुझा प्रश्न असेल तर कांहीएक व्यर्थ शीण न करतां आपल्या चित्तास विषयवासनेच्या ओढाताणीतून सोडवून स्थीर कर आणि निजबोधानें शांत रहा
देह, पुत्र, स्त्री, गृह, धन इत्यादिकांच्या प्राप्तीविषयीं व रक्षणाविषयीं प्रापंचिक खटाटोप तूं रात्रंदिवस करीत आहेस, व हरीचें भजन मात्र मुळींच करीत नाहीस तें कां बरें ? हरीचें भजन कर म्हणजे तूं या संसारसागरांतून तात्काळ तरून जाशील, असे संत ज्ञानेश्र्वर महाराजांच्या अभंगातून संस्कार घडवले जातात.
या हरिपाठ सेवेसाठी ह.भ.प.अशोक घावटे,अर्जुन गव्हाणे, बोरसे काका, सुखदेव ढेरंगे,रवींद्र गोसावी, मृदुंगवादक अनिल कुंभार,बाळासाहेब ढेरंगे, मंदिराचे पुजारी संपत ढगे, भामाबाई गव्हाणे, लक्ष्मी गोसावी, भाग्यश्री गोसावी, अश्विनी ढेरंगे, अश्विनी सवाशे, मंजुळा गव्हाणे, सुवर्णा ढेरंगे, संगीता ढेरंगे, संगीता देशमुख, भारती फडतरे हे नित्यनेमाने आपली सेवा करत असतात.