पांडुरंगाच्या काकड आरतीने ग्रामस्थांची भक्तिमय व चैतन्यदायी दिवसाची सुरुवात
कोरेगाव भिमा – कोरेगाव भिमा ( ता.शिरूर) येथे ‘‘उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा’’ अशी पांडुरंगाला आर्त हाक देत मंगल आणि भक्तीमय वातावरणात काकड आरतीला सुरुवात झाली. पहाटेच्या काकड आरतीने गावकऱ्यांना जाग येत असून कोजागिरी पौर्णिमेनंतर सुरू होणाऱ्या काकड आरतिला भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहत असतात. काकड आरती मोठ्या भक्तिमय व उत्साहाच्या वातावरणात दोन्ही मारुती मंदिरात सुरू आहे. सकाळच्या प्रहरी भगवंतांचे नाम स्मरण करत ,विविध उपदेशात्मक , जीवनाविषयी ज्ञान देणाऱ्या संतांच्या अभंग ,गौळणी कानी पडल्याने लहान पोरांपासून ते वयस्कर अजोबापर्यंत सर्वांचा दिवस भक्तिमय प्रेरणात्मक वातावरणाने सुरू होत आहे . संत वचने कमी पडल्याने कोरेगाव करांची सकाळ ज्ञानमय व चैतन्यदायी होत आहे.
भक्तिचिये पोटी बोध काकडा ज्योति |
पंचप्राण जीवे – भावे ओवाळू आरती ||
ओवाळू आरती माझ्या पंढरीनाथा | याबरोबरच
दोन्ही कर जोडोनि चरणी ठेविला माथा || असे मधुर स्वर आळवत पांडुरंगाची काकड आरती ग्रामीण भागात सुरू झाल्या आहेत.
करुनि विनवणी पायी ठेवितो माथा ! परिसावी विनंती माझी पंढरीनाथा !! अशा प्रकारे वीणा ,पेटी वादन , टाळ व मृदूंगाचा गजर करीत , अंतःकरणापासून मुखाने हरिनामाचा जयघोष करून संताच्या अभंगांच्या , तालावर पांडुरंगाचा धावा करून प्रसन्न करणाऱ्या काकडा आरतीची सुरुवात ग्रामीण भागात झाली असून दरवर्षी कोजागिरी पौर्णिमा म्हटले कि , सांप्रदायिक क्षेत्रामध्ये पांडुरंगाची भक्ती करणाऱ्या भाविकांसाठी आणि वारकरी संप्रदायासाठी अनन्य साधारण महत्व असणाऱ्या कार्तिक महिन्याच्या शुक्ल एकादशीपासून त्रिपुरी पौर्णिमेपर्यंत दररोज पहाटे देवाला जागविण्यासाठी मंदिरात संपूर्ण महिनाभर म्हणजे त्रिपुरी पौर्णिमेपर्यंत सुरू असतो .
यानिमित्त दररोज पहाटे लवकर प्रत्येक मंदिरांमध्ये अभंग, वासुदेव, पांगुळ, नाटाचे अभंग गौळणी गात भक्तिरसात ग्रामीण डौलात, ठेक्यात आणि भरदार आवाजात काकड आरती सुरु असते. सर्व भजनी मंडळे मोठ्या उत्साहात आणि आनंदाने भक्तीरसात अक्षरशः न्हाऊन निघतात.
उठा जागे व्हा रे आतां । स्मरण करा पंढरीनाथा ।भावें चरणीं ठेवा माथां । चुकवीं व्यथा जन्माच्या
पहाटेच्या प्रसन्न वातावरणात लवकर मंदिरात शुचिर्भूत होऊन भजनी मंडळी भजन सुरू करतात महिला व पुजेचा मान असणारे देवाला पाणी, दही ,दूध ,मध ,साखर, अत्तर यांनी अभिषेक घालतात देवाला सुंदर आकर्षक वस्त्रे नेसवून चंदन,अष्टगंध,बुक्का, अत्तर लावतात नवीन वस्त्र, अलंकार, मुकुट,बाजूबंद घातलेले हे देवाचे रूप पाहून पहाटेच्या प्रसन्न थंडीच्या वातावरणात मन आनंदून जाते,पांडुरंगाची दृष्ट काढली जाते,लिंब लोन केले जाते हे प्रसंग डोळ्यात साठवावे असेच असतात. देवाला काकड्याने ओवाळले जाते.यावेळी भजन करणारी मंडळी संतांचे अभंग आळवतात .पहाटेच्या वातरणातील संत अभंग जीवनाविषयी चिंतन करायला लावतात विविध अभंगाने देवाला आळवतात आणि भैरवी रागावर आधारित गायन करत शेवटी देवतांच्या आरत्या घेत काकड आरतीची सांगता करतात .
कोरेगाव भीमा येथे काकड आरतीसाठी नित्यनेमाने अशोक घावटे, अर्जुन गव्हाणे,बाबसाहेब गव्हाणे, भाऊसाहेब ढेरंगे, रवींद्र गोसावी, माजी उपसरपंच राजाराम ढेरंगे,म्हस्कू शिवले,शहाजी ढेरंगे, सुखदेव ढेरंगे, बोरसे काका,
बबन घावटे, रवींद्र गोसावी , पखवाज वादक राजेंद्र शिपलकर , संपत ढगे,दिलीप ढेरंगे ,नितीन पोपट गव्हाणे, बाळासाहेब ढेरंगे, प्रकाश खैरमोडे, बाबुलाल पोटफोडे,विवेक ढेरंगे, भामाबाई गव्हाणे,संगीता ढेरंगे, माजी ग्राम पंचायत सदस्या अंजली ढेरंगे, कोकीळ काकू इतर भाविक , ग्रामस्थ , भजनी मंडळी उपस्थित होते.