पूर्व हवेली परिसरातील राजकीय, सामाजिक व सहकार क्षेत्रातील एक आदर्श नेतृत्व तसेच प्रबळ इच्छाशक्ती व अनुभवाच्या शिदोरीवर अनेकांना मार्गदर्शन, पाठबळ आणि अनेक राजकीय नेत्यांशी ऋणानुबंध जपणारे दृष्टे व्यक्तिमत्व म्हणून माणिकराव अमृतराव सातव पाटील उर्फ दादांनी जनमाणसात आपले स्थान निर्माण केले.
आपल्या सामाजिक व राजकीय कारकीर्दीत ग्रामपंचायत, सहकारी सोसायटी, पंचायत समिती अशा विविध निवडणुका लढवत जनहिताची अनेक विकासकामे करताना त्यांनी आपले कर्तृत्व तर सिद्ध केलेच. मात्र स्थानिक पातळीवरील राजकीय व्यक्तींपासून आजी-माजी आमदार तसेच विद्यमान उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार यांच्याशी थेट संपर्क व संवादातून ‘दादांनी आपली वैचारीक तसेच राजकीय अनुभवाची समृद्धीही वेळोवेळी सिद्ध केली.
कौटुंबिक पार्श्वभुमी –
जन्म १ जून १९५७ रोजी वाघोली गावात शेतकरी कुटुंबात झाला. वडील अमृतराव विठोबा सातव पाटील हे गावचे पोलिस पाटील तर आजोबा विठोबा सातव पाटील यांचाही सामाजिक व राजकीय क्षेत्रात प्रभाव होता. या सामाजिक व राजकीय वलयाचे संस्कार दादांवरही झाले. माध्यमिक शिक्षण पुर्ण होताच कुटुंबात मोठे असलेल्या दादांना हा वारसा पुढे चालवण्याची जबाबदारी स्वतःच घ्यावी लागली. त्यांच्यातील अंगभुत नेतृत्व गुणांमुळे तसेच सामाजिक व राजकीय क्षेत्रातील जबाबदारी लवकर खांद्यावर आल्याने त्यांचे उच्च शिक्षणाचे स्वप्न मात्र अपुर्णच राहीले. परंतू जनसंपर्क व अनुभवाच्या जोरावर वाघोली गावच्या सामाजिक, राजकीय, उद्योग, सहकार व शैक्षणिक विकासात माणिकरावदादांच्या मार्गदर्शनाखाली सातव पाटील परिवाराने नेहमीच भरीव योगदान दिले. त्यामुळे वाघोली परिसराच्या वेगवान विकासालाही चालना मिळाली.
सन १९७९ मध्ये ‘दादा’ कळस गावातील प्रख्यात अशा धापटे परिवारातील दत्तात्रय चिमाजी धापटे यांची मोठी मुलगी ‘अलका’ यांच्याशी विवाहबद्ध झाले. राजकारणातील प्रत्येक मोठ्या व्यक्तीच्या यशामागे त्यांच्या पत्नीचेही मोठे योगदान व परिश्रम असतात. तीच भुमिका घेत ‘अलका’ या दादांच्या पत्नी व मोठ्या सुनबाई म्हणून ‘निर्मला’ या नव्या नावाने सातव परिवारात आल्या. त्यांनी कुटूंबातील ज्येष्ठांची सेवा, मुलांवरील संस्कार, घरात येणाऱ्या पै-पाहुण्यांचे आदरातिथ्य याची जबाबदारी अतिशय सक्षमपणे पेलत दादांना सदैव पाठबळच दिले.
राजकीय पार्श्वभुमी असल्याने घरी सतत येणारे कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच पाहुण्यांचा राबता असे. अशावेळी दादांच्या अपेक्षेनुसार त्यांचे चहापाणी, जेवणाची व्यवस्था करताना निर्मलाताई यांनी घरातून कोणालाही कधीही उपाशी जाऊ दिले नाही. तसेच गरजवंत म्हणून घरी आलेल्या अनेकांना दादांनी मदतीचा हातही दिला. त्यामुळे संपुर्ण गावाला माणिकराव ‘दादा’ तसेच निर्मला वहीनींचा आधार वाटे. सातव परिवारातही थोरले असल्याने प्रत्येक कार्यात माणिकराव यांनी दादा’ तसेच निर्मलाताई यांना मोठी आई म्हणून आपल्या नात्यांची जबाबदारीही सक्षमपणे सांभाळली. मोठ्या भावाच्या भुमिकेतून दादांनी तर मोठ्या वहीणींच्या भुमिकेतून निर्मलाताईनी परिवारातील सदस्यांच्या विवाहासह इतर कार्यातही आपली नैतिक जबाबदारी संपुर्णपणे पार पाडली.
एवढेच नव्हे तर कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळत ग्रामपंचायत व सहकारी सोसायटीतही निर्मलाताईंनी दादांच्या खांद्याला खांदा लावून समाजकारण व राजकारणातही सहभाग घेतला. माणिकरावदादा व निर्मलाताई यांच्या कुटूंबवेलीवर तीन फुले उमलली. एक मुलगा व दोन कन्या अशा परिवारात दादांनी मुलींनाही शिक्षणासाठी सदैव पाठबळ दिले. दादांच्या दोन्ही कन्या सुशिक्षित व कर्तृत्ववान असून दादांनी दोघींनाही पुण्यात बहिणींच्याच कुटुंबात दिल्याने जुने नातेसंबंध अधिक दृढ झाले. मोठी मुलगी डॉ. सारीका गौतम बहीरट यांनी पीएचडीचे शिक्षण पुर्ण केले असून एसएनडीटी महाविद्यालयात ज्ञानदानाचे कार्य करीत आहेत. तर दुसरी कन्या उद्योजिका सुरेखा तुषार निम्हण याही उत्कृष्टपणे हॉटेल व्यवसाय करीत आहेत.
सामाजिक राजकीय वाटचाल….
दादांनी अत्यंत लहान वयात राजकीय कारकीर्दिस सुरुवात केली. वयाच्या २१ व्या वर्षी ते ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आले. त्यानंतर त्यांनी वाघोली ग्रामविकास पॅनेलच्या माध्यमातून निवडून येवून गावचे सरपंचपदही भुषवले. या काळात वाघोली गाव परिसरात रस्ते, वीज, पाणी, शिक्षण, आरोग्य यासह नागरीहितासाठी शासनाच्या वेगवेगळ्या विकासाच्या योजना आणून त्यांनी वाघोली गावचा कायापालट केला तर त्यानंतर त्यांनी विकासाची ही वाटचाल अधिक पुढे नेण्यासाठी हवेली पंचायत समितीचीही निवडणुक लढवत त्यातही भरभरुन यशसंपादन केले. पंचायत समिती निवडणुकीचा हा टप्पा गाठल्यानंतर त्यांनी वाघोलीसह पूर्व हवेलीच्या सर्वांगिण विकासासाठीही जाणीवपूर्वक लक्ष दिले…
दरम्यान पूर्व हवेलीतील शेतकरी वर्गाची गरज ओळखून त्यांनी वाघोलीत विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची स्थापना केली. या संस्थेचे संस्थापक चेअरमन म्हणून त्यांनी मोठे योगदान दिल्याने या संस्थेच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना आर्थिक पाठबळ मिळून मोठा दिलासा मिळाला. तसेच श्रीअमृत सहकारी पाणीपुरवठा संस्थेच्या स्थापनेतही पुढाकार घेत उपसा जलसिंचन योजना राबवल्याने शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत झाली.-
मात्र एवढ्यावरच न थांबता त्यांनी उसउत्पादक शेतकऱ्यांना योग्य न्याय देण्यासाठी थेऊर येथील यशवंत साखर कारखान्यात स्वीकृत संचालक म्हणून त्यांनी काम केले. तर शिरूर तालुक्यातील जातेगाव येथील व्यंकटेश कृपा साखर कारखान्याचे संस्थापक संचालक म्हणूनही शेतकरी वर्गासाठी प्रभावीपणे काम केले. शेतकरी वर्गाला केंद्रबिंदू मानून दादांनी या दोन्ही पदांच्या माध्यमातून शेतकरी बांधवाना न्याय देण्याचे काम निस्वार्थीपणे केले. आपल्या राजकिय कारकिर्दीत आपल्या गावाचाही सर्वांगिण विकास व्हावा, या उद्देशाने त्यांनी अनेक तरुणांना राजकारणाचा कानमंत्र देत राजकारणात ठसा उमटविण्यासाठी प्रोत्साहन दिले. तसेच वेळोवेळी मार्गदर्शनही केले. त्यामुळे आज वाघोली गावातील अनेक तरुण त्यांचा आदर्श ठेवून राजकारणात कार्य करीत आहेत.
तसेच गावचे ग्रामदैवत असलेल्या भैरवनाथ देवाचा उत्सव अधिक चांगला व्हावा, याकरीता वाघोली गावातील ज्येष्ठ मान्यवरांना सोबत घेवून भैरवनाथ देवस्थान ट्रस्टही स्थापन केले. त्यामुळे भैरवनाथ देवाच्या उत्सवासह विविध धार्मिक कार्यक्रम दादांच्या मार्गदर्शनाखाली अधिक चागल्या रितीने होवू लागले, तसेच देवस्थान परिसराच्या विकासालाही चालना मिळाली. धार्मिक क्षेत्रात काम करीत असताना दादांनी ग्रामदैवत भैरवनाथाची आजन्म सेवा केली. तर अनेक मंदिरांच्या जिर्णोध्दारासाठीही त्यांनी मोलाचे योगदान दिले. तर नगररस्त्याने आळंदी, पंढरपुर तसेच शिर्डीला जाणाऱ्या दिंड्या तसेच वारकरी भाविकांना तर दादांचा ‘तोरणा बंगला हे हक्काचे ठिकाण होते. यावेळी प्रत्यक्ष पांडुरंगाचीच सेवा म्हणून दादा आणि वहिनी मोठ्या भक्तीभावाने घरी आलेल्या दिंड्या तसेच वारकऱ्यांची सेवा करीत असत.
दरम्यान कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे दादांना स्वतः चे उच्चशिक्षणाचे स्वप्न साकारता आले नसले तरीही आपले वाघोली गाव व परिसरातील नवी पिढी उच्चशिक्षित झाली पाहीजे, या उदात्त हेतूने दादांनी समविचारी सदस्यांच्या सहयोगातून वाघोली येथे अमृत एज्युकेशन सोसायटीची स्थापन केली. तसेच पुण्यातील श्री शिवाजी मराठा सोसायटीतही त्यांनी उपाध्यक्षपदाची धुरा सांभाळली. तसेच श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या कारभारी मंडळाचेही अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली होती. पुण्यातील शुक्रवार पेठेतील आप्पासाहेब जेधे महाविद्यालयाचे चेअरमन म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली. तर पुणे येथील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी शैक्षणिक कार्यात मोठे योगदान दिले. एवढेच नव्हे तर अनेक गरजु विद्यार्थ्यांचा महाविद्यालय प्रवेश शैक्षणिक फी यासह शिक्षणासाठी भरीव मदत केल्याने अनेकांचे शिक्षणाचे स्वप्न साकार झाले. तर स्थानिक पातळीवर बीजेएस शिक्षण संस्था, संतुलन संस्था यासारख्या संस्थांना तसेच विद्यार्थ्यांनाही त्यांचे सहकार्य असे. दरम्यान हवेली पंचायत समितीच्या सदस्यपदी कार्यरत असताना माणिकराव दादांनी पुढाकार घेऊन भुकंपग्रस्तांच्या मदतीसाठी सकाळ रिलीफ फंडाला १६ हजार ७५१ रुपये दिले होते.
तसेच पुणे रोटरी क्लबच्या माध्यमातूनही रक्तदान, आरोग्य तपासणी, अनेक जनहिताचे उपक्रम राबविले. तर समाजातील विचारवंत, साहित्यीक, सामाजिक कार्यकर्ते यांच्याशीही दादांचा संवाद तसेच विविध सामाजिक उपक्रमात सहभाग असे. दरम्यान अपंग बांधवांचे प्रश्न सोडवून त्यांना पाठबळ देण्यासाठी त्यांनी वाघोली येथे उत्कर्ष अपंग स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्थेची स्थापना केली. या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष म्हणून काम करताना त्यांनी अपंग बांधवांचे विविध प्रश्न शासनदरबारी मांडून त्यांना पाठबळही दिले. तर सामाजिक क्षेत्रात काम करताना त्यांनी भारतीय मानवाधिकार असोसिएशन या संस्थेतही पदाधिकारी म्हणून आपल्या कार्याचा ठसा उमटवला.
दादांचा विविध राजकीय व्यक्तींशी जवळचा संपर्क होता. यामध्ये ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार, विद्यमान उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, खासदार सुप्रियाताई सुळे, खासदार डॉ. अमोल कोल्हे, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, छत्रपती शाहु, छत्रपती संभाजीराजे, मनोहर जोशी, रामकृष्ण मोरे, गिरीश बापट, कृष्णराव भेगडे, नानासाहेब नवले, विठ्ठलराव तुपे, भाई वैद्य, ज्येष्ठ अभिनेता निळू फुले, अभिनेता सिद्धार्थ जाधव, तसेच विद्यमान आमदार अॅड. अशोक पवार, आमदार रोहितदादा पवार, सुनिल माजी मंत्री दत्तात्रय भरणे मामा, शशिकांत सुतार, माजी आमदार बाबुराव पाचर्णे, ज्ञानेश्वर लांडगे, बापूसाहेब पठारे, यांच्याशीही त्यांचा थेट संपर्क व संवाद असे. यातील अनेक नेत्यांनी दादांच्या ‘तोरणा’ बंगल्यावर आवर्जुन भेटही दिली होती.
दरम्यान २००१ मध्ये चिरंजीव संदीप यांच्या अपघाती निधनाने त्यांना आयुष्यातील सर्वात मोठा धक्का बसला. मात्र या प्रतिकुल परिस्थितीतही सावरत त्यांनी कुटूंबाला धीर दिला. सावली देणाऱ्या एखाद्या वटवृक्षाप्रमाणे सकारात्मकतेने आपले सामाजिक कार्य सुरुच ठेवले. समाजाच्या विविध घटकात रमणाऱ्या दादांनी वडील अमृतराव सातव पाटील यांची उतारवयात सेवासुश्रूशाही कुटूंबियांसह उत्तमप्रकारे केली. कुटूंबात दोन्ही बंधु, राजेंद्रआण्णा, संजय आप्पा, दोन्ही बहिणी, भावजयी, तसेच कन्या, विशेषतः नातवडांविषयीही त्यांना खूप जिव्हाळा होता. त्यांच्यासह सर्व सदस्यांसाठीही ते आवर्जुन वेळ काढत, त्यांची आवर्जुन विचारपूस करीत असत. मोठ्यांसह लहानातही ते वय विसरुन समरस होत असत.