Thursday, November 21, 2024
Homeताज्या बातम्याकराड-चिपळूण राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्तीचे काम तातडीने पूर्ण करा -पालकमंत्री शंभूराज देसाई

कराड-चिपळूण राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्तीचे काम तातडीने पूर्ण करा -पालकमंत्री शंभूराज देसाई

प्रतिनिधी हेमंत पाटील

सातारा दिनांक १४ डिसेंबर
कराड-चिपळूण राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्तीचे काम तातडीने सुरु करा. ज्या ठिकाणी काम करणे शक्य आहे तेथील काम आठ दिवसात पूर्ण करावे अशा सूचना राज्य उत्पादन शुल्क तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या. कराड- चिपळूण राष्ट्रीय महामार्ग व सातारा पोलिस विभागाकडील जागा राज्य उत्पादन शुल्क विभागास हस्तांतरणाबाबत पालकमंत्री देसाई यांनी दूरदृष्यप्रणालीद्वारे आढावा घेतला.

यावेळी दूरदृष्यप्रणालीद्वारे महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव नितिन करीर, गृह विभागाचे प्रधान सचिव संजय सक्सेना, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे प्रधानसचिव मिलिंद म्हैसकर, राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त विजय सूर्यवंशी, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया,  पोलिस अधिक्षक समीर शेख, अतिरिक्त जिल्हाधिकारी जीवन गलांडे,  राष्ट्रीय महामार्ग प्रादेशिक विभाग मुंबईचे मुख्य अभियंता संतोष शेलार, राष्ट्रीय महामार्ग विभाग पुणेचे कार्यकारी अभियंता धनजंय देशपांडे,  एल ॲण्ड टी कंपनीचे परेश वारुळे, रविंद्र मोहिते आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

ज्या ठिकाणी राष्ट्रीय महामार्गाचे दुरुस्तीकरण आवश्यक आहे तेथे डांबरीकरणातून दुरुस्ती करण्याच्या सूचना देऊन पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, विहे घाटातील डांबरीकरण, मल्हार पेठेतील क्राँक्रीटीकरण, नवसरी येथे डांबरीकरण, नाडे, अडूळ, म्हावशी येथील क्राँक्रीटीकरणाचे काम आठ दिवसाच्या आत सुरु करुन तातडीने पूर्ण करावे. तसेच पाटण ते संगमनगर धक्का व संगमनगर धक्का ते घाट माथा या रस्त्याचे काम डांबरीकरणातून तातडीने पूर्ण करुन महामार्ग वाहतुक योग्य करावा. तसेच या रस्त्याच्या निविदेची फेर प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करुन ६ महिन्यांच्या आत काम सुरु करावे. एल ॲण्ड टी कंपनीने या रस्ता कामाचे गांभीर्य लक्षात घेऊन गरज पडेल तिथे स्थानिकांच्या मदतीने काम मार्गी लावावे. हे काम लवकर पूर्ण होण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्याशी समन्वय ठेवावा, अशा सूचनाही पालकमंत्री देसाई यांनी दिल्या.

यावेळी बैठकीमध्ये राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व एल ॲण्ड टी कंपनीने तातडीने काम सुरु करुन रस्ता वाहतूक योग्य करण्याचे मान्य केले. त्यादृष्टीने आवश्यक कार्यवाही आजच सुरु करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

पोलिस विभागाकडील जागा राज्य उत्पादन शुल्क विभागास हस्तांतरणा बाबतचा आढावा सातारा पोलिस विभागाकडील जागा राज्य उत्पादन शुल्क विभागाला हस्तांतरीत करण्याविषयी पालकमंत्री देसाई यांनी आढावा घेतला. यावेळी महसूल, गृह व राज्य उत्पादन शुल्क विभाग यांनी समन्वयाने चर्चा करुन याविषयी सकारात्मक निर्णय घ्यावा. जिल्हाधिकारी यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी सातारा यांना लागणारी आवश्यक जागा उपलब्ध करुन द्यावी, अशा सूचनाही पालकमंत्री देसाई यांनी योवळी केल्या.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!