पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त संभाजी ब्रिगेडतर्फे अभिवादन.
पुणे -पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी अनेक सामाजिक सुधारणा केल्या. यामध्ये स्त्रीशिक्षण, हुंडाबंदी, पर्यावरण रक्षण असे सुधारणावादी तसेच ग्रामविकास आणि पायाभूत सुविधांच्या विकासाच्या योजना, प्रकल्प जाणीवपूर्वक राबविले. नदीचे घाट, वाटसरूंसाठीच्या धर्मशाळांची उभारणी केली. आपल्या राज्यकारभाराने प्रजाहितदक्षतेचा आदर्श घालून दिला, असे प्रतिपादन संभाजी ब्रिगेडचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष सतिश काळे यांनी केले.पुण्यश्लोक
अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी येथील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून संभाजी ब्रिगेडच्या वतीने अभिवादन करण्यात आले. या वेळी मार्गदर्शन करताना सतिश काळे बोलत होते.यावेळी काळे म्हणाले की, अहिल्यामाई होळकर या केवळ एक महान शासकच होत्या. अनेक युद्धांमध्ये साहसी योध्याप्रमाणे त्या विचारपूर्वक निर्णय घेत असत. त्यांनी युद्धाचे नेतृत्व सुद्धा केले आहे.अहिल्यामाई आपल्या प्रांताच्या रक्षणार्थ व अन्याया विरुद्ध आक्रमण करण्यास कधीही मागेपुढे पाहत नसत. इतिहासाच्या कालपटावर त्यांनी स्त्री व्यक्तिमत्त्वाचा ठसा उमटविला आहे. त्यांचा आदर्श आजच्या स्त्रीयांपुढे कायम प्रेरणा देणारा आहे.
या वेळी संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष सतीश काळे, उपाध्यक्ष अभिषेक गायकवाड, संघटक निलेश शेंडगे, सहसचिव योगेश पाटील, मराठा सेवा संघाचे अशोक सातपुते, दिलीप कैतके, राजेंद्र गाडेकर, अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेश महासचिव मनोज मोरे,पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मच्छिंद्र चिंचोळे,शहर उपाध्यक्ष सचिन भिसे, परशुराम कड यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.