केंदूरचा सिध्देश साकोरे युनायटेड नेशन्सने ठरविला ’लॅंड हिरो’ : जर्मनीत भव्य कार्यक्रमात सिध्देशला सन्मानपत्र प्रदान
केंदूर (ता.शिरूर) येथील सिद्धेश बाळासाहेब साकोरे या युवकाची संयुक्त राष्ट्र संघटनेच्या युनायटेड नेशन्स कन्व्हेन्शन टू कॉम्बॅट डेजर्टिफिकेशन (UNCCD) च्या प्रतिष्ठित ‘लँड हिरो’ या सन्मानासाठी नुकतीच निवड झाली. या निमित्ताने त्यांना जर्मनीत भव्य समारंभात सन्मानित करण्यात आले. सद्यस्थिती जगभरातील लागवडयोग्य जमिनींचा पोत ऱ्हास करणाऱ्या कारणांचा शोध आणि त्यावर ठोस उपाययोजनांच्या समस्यांशी लढण्यासाठीच्या केलेल्या नावीन्यपूर्ण उपायांची जागतिक पातळीवर संयुक्त राष्ट्र संघटनेने दखल घेत वरील पुरस्कार सिध्देश यांना प्रदान झाला.
सिद्धेश हे केंदूरमधील महादेववाडीतील एका अल्पभूधारक शेतकरी कुटुंबात वाढलेले. इयत्ता दहावी त्यांनी धामारी (ता.शिरूर) येथे केली तर पुढे पुण्यात मॅकेनिकल इंजिनिअर होवून ते त्यांचे महाविद्यालयीन मित्र जयदीप बबनराव सरोदे (मुळ गाव पिंपळगाव-पिसा, ता.श्रीगोंदा, जि.अ.नगर) यांना सोबत घेऊन पाबळ (ता.शिरूर) येथील विज्ञान आश्रमात शेतीशी संबंधित प्रश्नांवर संशोधन करीत धामारीत या दोघांनी काही शेतक-यांना सोबत घेवून अॅग्रो रेंजर्स संस्था स्थापन करुन त्याद्वारे शिरुर-आंबेगाव-खेड या तीन तालुक्यातील १ हजार शेतक-यांसोबत काम सुरू केले. यात शेतीच्या पोत ऱ्हासाची कारणे शोधून त्यावर या दोघांनी उपाययोजना करुन सेंद्रीय कर्ब ०.०३ (धोकेदायक) पासून तो ०.०१ (सुरक्षित) इतका करुन दाखविला. याच त्यांच्या प्रयोगाची दखल थेट संयुक्त राष्ट्र संघटनेच्या युनायटेड नेशन्स कन्व्हेन्शन टू कॉम्बॅट डेजर्टिफिकेशन (UNCCD) यांनी घेतली व सिद्धेश यांना युनायटेड नेशन्सचे जनरल सेक्रेटरी इब्राहीम थिऑ यांनी लॅंड हिरो म्हणून जाहीर करीत त्याचा भव्य सत्कारही केला. दरम्यान सिध्देशच्या या यशाबद्दल विज्ञान आश्रमचे वतीने खास सेलिब्रेशन लवकरच संस्थेत केले जाणार असून धामारी व केंदूरमधील ग्रामस्थही सिध्देश भारतात परतल्यावर त्याचा जंगी सत्कार करणार असल्याची माहिती डॉ.योगेश कुलकर्णी व केंदूरचे सरपंच अमोल थिटे यांनी दिल