स्मारकाच्या निधीसह राजगुरुंच्या जयंतीनिमित्त बलिदान दिन साजरा करून शासकीय सुटी जाहीर करण्याची मागणी
पुणे – हुतात्मा राजगुरु, भगतसिंह,सुखदेव यांचा बलिदान स्मरण दिन दि.२३ मार्च रोजी देशभर साजरा होत आहे. या धर्तीवर आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी हुतात्मा शिवराम हरी राजगुरु यांचे जन्मस्थळ असलेल्या हुतात्मा राजगुरु स्मारकाची लक्षवेधी मांडून संपूर्ण सभागृहाचे लक्ष या विषयाकडे वेधले. हुतात्मा राजगुरु, भगतसिंह,सुखदेव यांनी अगदी तरुण वयात २३ व्या वर्षी हसत-हसत फासावर जाऊन या देशासाठी बलिदान दिले.
हया बलिदानातून आपण आजचे स्वातंत्र्य अनुभवत व उपभोगत आहोत. पुणे जिल्हयातील खेड-राजगुरुनगर हे हुतात्मा शिवराम हरी राजगुरु यांचे जन्मगाव येथे हुतात्मा राजगुरु यांचे जन्मस्थळ व राजगुरुवाडा आहे. शासनाने याला संरक्षित स्मारक म्हणून दर्जा दिलेला आहे. परंतु अजूनही गेली अनेक वर्षे म्हणजेच ७५ वर्षे देशाच्या स्वातंत्र्याला होऊन देखील हुतात्मा राजगुरु यांचे भव्य-दिव्य स्मारक उभे राहू शकलेले नाही. गेल्या कित्येक वर्षांपासून याबाबतच्या निधीच्या घोषणा झाल्या परंतु निधी प्रत्यक्षात मिळालाच नाही.
राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हुतात्मा शिवराम हरी राजगुरुंच्या स्मारकाबाबत सरकार गंभीरपणे काम करत आहे. या अगोदरही निधी दिला आहे. पर्यटन विभागाने ५० लाख रुपये उपलब्ध करून दिले आहेत. मागील आराखड्याच्या किंमतीत आता वाढ झाली आहे. स्थानिक आमदार दिलीप मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येईल. त्यात आमदारांच्या सूचनांचा अंतर्भाव करून दोन महिन्यांत अंतिम आराखडा तयार करण्यात येईल, अशी घोषणा मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. या स्मारकाच्या कामाबाबतचा अहवाल दर अधिवेशनात पटलावर माहिती ठेवण्याची तरतूद करण्यात येईल. ज्या अधिकाऱ्यांवर जबाबदारी आहेत, त्यांची नावे यात असतील. तसेच, जे अधिकारी या कामात कुचराई करतील, त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी सर्व सभागृहाने एकत्रित येऊन करावे, असेही मंत्री मुनगंटीवार यांनी सूचविले.
हुतात्मा राजगुरु यांच्या स्मारकाबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार आणि खेडचे आमदार दिलीप मोहिते, अतुल भातखळकर यांनी प्रश्न विचारला होता. त्यावेळी मुनंगटीवार यांनी उत्तर दिले. हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांचे स्मारक राजगुरुनगर (ता. खेड, जि. पुणे) येथे उभारण्यात आले आहे. मात्र हे स्मारक आता दुर्लक्षित झाले आहे. भगतसिंग आणि सुखदेव यांच्यासंदर्भात त्या त्या राज्यात हुतात्मा दिवस साजरा केला जातो. पंजाबमध्ये शासकीय सुटी दिली जाते. हुतात्मा राजगुरुंच्या जयंतीनिमित्त बलिदान दिन साजरा करून शासकीय सुटी जाहीर करावी, अशी मागणी आमदार मोहिते यांनी केली.
हुतात्मा राजगुरुंच्या जन्मस्थळी उभारण्यात येणाऱ्या राष्ट्रीय स्मारकासाठी सरकार विशेष बजेट जाहीर करणार का, अशी विचारणाही त्यांनी लक्षवेधीद्वारे केली. अजित पवार यांनी जेवढा निधी दिला, तेवढाच मिळाला आहे. त्यानंतर निधी मिळालेला नाही, असेही मोहिते यांनी स्पष्ट केले.
आमदार मोहितेंच्य प्रश्नाला उत्तर देताना मुनगंटीवार म्हणाले की, गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली स्मारकाबाबतचा आराखडा तयार करण्यात आला होता. मात्र, मागील अडीच वर्षांत आपल्याला पुढे जात आले नाही. स्मारकाच्या आराखड्यात ३० ते ४० टक्के वाढ झाली आहे. तसेच, आमदार मोहिते यांच्या सूचनांचा अंतर्भाव करत एक समिती स्थापन करून दोन महिन्यांच्या आतमध्ये पुन्हा आराखड्यासंदर्भातील चर्चा करण्यात येईल. अंतिम आराखडा तयार करण्यात येईल. राजगुरुनगर हे ऊर्जेचे, पराक्रमाचे, वीरतेचे केंद्र व्हावे, असे काम सरकार करेल. यापूर्वी शासनाने हु.राजगुरु स्मारक विकास आराखडा केला मात्र ८६.२५ कोटी रुपयांचा आराखडा हा कागदावरच राहिल्याने आता त्याच आराखडयाची किंमत १३० ते १५० कोटी रुपया पर्यंत गेलेली आहे. शासन हया बलिदान स्मरण दिनाला शासन निधी देऊन या हुताम्यांना श्रध्दांजली देणार का ? असा प्रश्न खेड-आळंदीचे राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी उपस्थित करत स्मारकाचा प्रश्न मार्गी लागला पाहिजे यासाठी सभागृहाचे लक्ष वेधले आहे.
आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी विधान सभेत उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी २ महिन्यात आमदार दिलीप मोहिते पाटील यांची समितीवर नेमणूक करुन या राजगुरु स्मारक विकास आराखडयाला मान्यता देणार असे सांगितले. त्याचबरोबर जो अधिकारी यात कुचराई करील. त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन सभागृहाला दिले.
याबाबत विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी यात बोलताना विकास आराखड्यात या अधिवेयानात निधी देणार का? तसेच बलिदान दिन व जयंती साजरी करण्यासाठी शासनाकडून निधी उपलब्ध करुन देणार का? त्याचबरोबर हुतात्मा राजगुरु यांच्या स्मारकाला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देणार का? असे प्रश्न उपस्थित केले. याला भाजपचे प्रवक्ते अतुल भातखळकर यांनी देखील पाठींबा दर्शविला. या विकास आरखड्याचा टप्पा तयार करुन त्याचा कालावधी पूर्ण होईल हे तरी मंत्री महोदय या सभागृहाला आश्वासित करतील का? सोमवार दिनांक १२ मार्च रोजी राजगुरु स्मारकाची लक्षवेधी सभागृहात गाजल्याने लवकरच हा प्रश्न मार्गी लागेल असा विश्वास राजगुरु प्रेमी यांना वाटत आहे.
लक्षवेधी नंतर आमदार दिलीप मोहिते पाटील व आमदार ॲङ अशोक पवार व राजगुरुनगर येथील हुतात्मा राजगुरु प्रेमी कार्यकर्ते ॲङ निलेश आंधळे, मधुकर गिलबिले गुरुजी, शुभम सोनवणे, सिद्धार्थ कांबळे, दिलीप बनसोडे, मयुर कानवडे, आदि कार्यकर्ते यांनी मंत्रालय येथील हुतात्मा राजगुरु चौकात जाऊन स्मारकाला निधी उपलब्ध मिळणेबाबत निदर्शने करण्यात आली.