आरोपीला झारखंड येथील साहेबगंज येथून केले जेरबंद
लोणीकंद (ता.हवेली) पोलीस स्टेशनच्या हद्दीत नगर रस्त्यावरील केसनंद रस्ता परिसरात असलेल्या गोदामात चोरी करून ॲपल कंपनीचे दोन कोटी रुपयांचे २६६ मोबाइल संच चोरणाऱ्या टोळीतील एकाला लोणीकंद पोलिसांनी झारखंडमधून अटक केली. त्याच्या साथीदारांचा शोध घेण्यात येत आहे. आरोपींनी मध्यस्थांच्या माध्यमातून मोबाइल संचांची विक्री केल्याचे उघडकीस आले असून चोरीचे मोबाईल विकत घेणाऱ्याचा लोणीकंद पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे.(Pune Crime News)
सलीम उर्फ असराऊल इस्माईल फजल शेख (वय ३५, रा. साहेबगंज, झारखंड) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. १७ जुलै रोजी केसनंद रस्त्यावरील ॲपल कंपनीच्या गोदामातून २६६ मोबाइल संच चोरून नेले होते. याप्रकरणाचा तपास लोणीकंद पोलिसांकडून करण्यात येत होता. पोलिसांनी गुन्ह्याची पद्धत, तसेच यापूर्वी झालेल्या चोरीच्या प्रकरणाची माहिती घेतली. तेव्हा झारखंडमधील साहेबगंज भागातील टोळी गोदामतून ऐवज चोरी करण्यात तरबेज असल्याची माहिती मिळाली.(Pune Crime News)
लोणीकंद पोलीस ठाण्यातील सहायक निरीक्षक गजानन जाधव आणि पथक झारखंडमधील साहेबगंज येथे तपासासाठी गेले. तेव्हा आरोपी पश्चिम बंगालमध्ये पसार झाल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांचे पथक पुन्हा झारखंडमध्ये पोहोचले. आरोपी सलीम शेख झारखंडमध्ये असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने त्याला सापळा लावून पकडले. चौकशीत त्याने साथीदारांच्या मदतीने गोदामातून महागडे मोबाइल संच चोरल्याची कबुली दिली.(Pune Crime News)
परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे, लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काइंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक गजानन जाधव, रवींद्र गोडसे, स्वप्निल जाधव, कैलास साळुंके, अजित फरांदे, अमोल ढोणे, साईनाथ रोकडे आदींनी ही कारवाई केली.