कोरेगाव भिमा – कोरेगाव भिमा (ता.शिरूर) येथील ग्रामसेवक रतन दवणे यांच्यावर कारवाई करण्यात यावी यासाठी प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या वतीने पत्रव्यवहार करण्यात आला असून याबाबत शिरूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी महेश डोके यांनी ग्रामसेवक रतन दवणे यांना २० नोव्हेंबर रोजी नोटीस बजावली होती यामध्ये दोन दिवसांमध्ये उत्तर देणे अपेक्षित होते पण ग्रामसेवक दवणे यांनी २९ नोव्हेंबर आली तरीही ग्रामसेवक दवणे यांनी उत्तर दिले नसल्याने वरिष्ठांच्या आदेशाला फाट्यावर मारत ठेंगा दाखवत कचरा पेटी दाखवली की काय ? असा प्रश्न निर्माण होत आहे.
प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या वतीने अपंग निधी जमा न करता खोरी आश्वासने देत कर्तव्य पालनात कसूर, अपंगांची दिशाभूल करत त्यांना फसवण्यासाठी पदाचा गैरवापर करणे व इतर बाबींचा उल्लेख करत कोरेगाव भिमा ग्राम पंचायतीची चौकशी करावी अशा आशयाचे तक्रार करणारे पत्र वरिष्ठांना ईमेल करण्यात आले होते.यावर शिरूरचे गट विकास अधिकारी महेश डोके यांनी रतन दवणे यांना कारणे दाखवा नोटीस बजावत दोन दिवसात खुलासा सादर करण्याचा आदेश दिला होता त्याला ग्रामसेवक रतन दवणे यांनी कोणतेही लेखी उत्तर न दिल्याने वरिष्ठांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली की काय ? असा प्रश्न निर्माण होत आहे.
शिरूरचे गट विकास अधिकारी महेश डोके यांनी ग्रामसेवक रतन दवणे यांना २० नोव्हेंबर रोजी बजावलेल्या कारणे दाखवा नोटीसमध्ये “यावरुन तुम्ही दिव्यांग दिशाभूल केल्याचे निदर्शनास येत आहे. तुमची सदर कृती पुर्णतः बेजबाबदारपणाची असून अतिशय गंभीर स्वरुपाची आहे. त्यामुळे तुमचे विरुध्द महाराष्ट्र जिल्हा परिषदा जिल्हा सेवा (शिस्त व अपील) नियम १९६४ नुसार शिस्तभंगाची कारवाई का प्रस्तावित करणेत येऊ नये याचा खुलासा दोन दिवसांत कार्यालयास सादर करणेत यावा. खुलासा विहीत मुदतीत व समाधानकारक प्राप्त न झालेस तुमचे विरुध्द शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्यात येईल याची गार्भीयाने नोंद घ्यावी.” नोटीस बजावली असून विहित कालावधीत वरिष्ठांनी बजावलेल्या नोटीसला उत्तर न देणाऱ्या ग्रामसेवक रतन दवणे यांच्या विरुद्ध गट विकास अधिकारी महेश डोके कारवाई करणार का? असा प्रश्न निर्माण होत आहे.
गट विकास अधिकारी यांच्या नोटीसला उत्तर न देणाऱ्या ग्रामसेवक रतन दवणे यांच्यावर जिल्हा परिषद जिल्हा सेवा (शिस्त व अपील) नियम १९६४ नुसार शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्यात येणार का ? वरिष्ठांच्या आदेशाचे उल्लंघन करत उत्तर न देणारे ग्रामसेवक दवणे यांच्या या प्रकारचे वरिष्ठ दखल घेत कारवाई करणार काय ? तसेच प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या पत्रातील मागणीनुसार ग्रामसेवक दवणे यांनी अपंगांना निधी देण्याची टाळाटाळ, कर्तव्यात कसूर कार्यलयीन कामकाज संहितेचे उल्लंघन, दिव्यांगांना फसवण्यासाठी पदाचा गैरवापर करणे, आर्थिक फसवणूकीचा प्रयत्न करणे, दिव्यांग कायद्याचे उल्लंघन करणे, दिव्यांगांना न्याय न देता त्यांच्यावर अन्याय करण्यासाठी व आर्थिक दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असून त्यांच्यावर तातडीने निलंबनाची कारवाई करण्यात येऊन ग्रामपंचायतीच्या कारभाराची चौकशी करण्यात येणार की अपंगांना न्यायासाठी आंदोलन करावेच लागणार का ?? असा प्रश्न निर्माण होत असून अपंगांचा कोणी कैवारी आहे की नाही ? त्यांच्या हक्कासाठी व त्यांच्या मागण्यांसाठी सरकार दरबारी किती दिवस संघर्ष करावा लागणार ? असा प्रश्न निर्माण होत आहे.