कोरेगाव भीमा – सणसवाडी ( ता.शिरूर)उद्योगनगरी सणसवाडी ग्राम पंचायतीचे ग्राम विकास अधिकारी बाळनाथ पवने यांना दुबई येथे ‘लाईफ टाईम ॲचिव्हमेंट अवार्ड ‘देऊन नुकतेच गौरविण्यात आले असून त्यांनी आत्तापर्यंत केलेल्या उत्कृष्ट व समर्पण सेवेबद्दल गौरवण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या नामवंत व्यक्तींच्या कार्याची दखल घेऊन पुण्यातील स्वयंदीप फौंडेशन व दुबई येथील काही संघटनाच्यावतीने दुबई येथे दरवर्षी लाईफ टाईम ॲचिव्हमेंट अवार्ड पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. व राज्यातील विविध मान्यवरांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. गेल्या चार वर्षांपासून पुण्यातील अधिकारी व विचारवंत डॉ. बबन जोगदंड यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम दरवर्षी दुबईत घेण्यात येतो. यावर्षी हा सोहळा ६ मार्च रोजी दुबई येथील पंचतारांकित मीडिया रोटाना या हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आला होता. यामध्ये महाराष्ट्रातील जवळपास ३० जणांचा सन्मान करण्यात आला.
या वर्षी हा अवॉर्ड सोहळा ए.एन.पी.ग्रुप्स, एस.के.ग्रुप्स,पुणे व स्वयंदीप फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून एस.के.ग्रुप्सचे प्रमुख सचिन चव्हाण, दुबई येथील ड्रीम डिझाईनचे संचालक कार्तिक दुर्वासुला, मिनाझ फईम,यशदा पुणे येथील अधिकारी डॉ.बबन जोगदंड, सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त महेंद्र रोकडे व राहुल भातकुले हे उपस्थित होते. यांच्या हस्ते मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. दुबई येथे हा मानाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
आत्तापर्यंत केलेल्या जनसेवेचा हा गौरव असून यापुढेही सेवाभावी वृत्तीने काम करणार असून या पुरस्काराने मोठी प्रेरणा मिळाली आहे. – बाळनाथ पवने, ग्राम विकास अधिकारी सणसवाडी