अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी यासाठी आमदार अशोक पवार यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र
अवकाळी पावसाने अनेक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून यामध्ये हवेली तालुक्यातील आळंदी,शिंदवणे,वळती,तरडे व इतर गावांमध्येही झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबतीत तातडीने पंचनामा करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी पुणे जिल्हाधिकारी यांना आमदार अशोक पवार यांनी पत्र दिले आहे.
आमदार ॲड.अशोक पवार यांनी वळती गावास भेट देऊन शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली.वळती गावात शेतकऱ्यांचे शेतीचे,लाईटचे खांब,डीपी याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.अवकाळी पावसामुळे सर्वत्र धुमाकूळ घातला असून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. अगोदरच शेतकरी अडचणीत असून त्यांना अवकाळी पावसाने आणखी अडचणीत आणले असून त्यांना पंचनामा होऊन योग्य ती मदत मिळायला हवी यासाठी आमदार अशोक पवार प्रयत्न करत आहेत.
शेतकऱ्यांना शासनाकडून योग्य ती मदत मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे आमदार अशोक पवार यांनी सांगितले असून याबाबतीत शासन दरबारी पाठपुरावा करून शेतकऱ्यांना मदत करणार असल्याचे सांगितले.