पुणे – थेरगाव येथील जिजाऊ सभागृहात महात्मा ज्योतिबा फुले विचार मंच यांच्या वतीने महात्मा फुले यांच्या स्मृतीदिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मराठा सेवा संघ उद्योग कक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश जाधव यांनी,” महात्मा ज्योतिबा फुले हे भारतातील महान पुरोगामी विचारांचे क्रांतीकारक समाजसुधारक होते. समानतेचे महान पुरस्कर्ते त्या काळातले प्रसिद्ध उद्योजक, महिलांसाठी शाळा सुरू करणारे, सत्यशोधक समाजाची स्थापना करणारे, शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणारे ज्योतिराव फुले हे क्रांती सूर्य होते.समाज सुधारण्यासाठी पूर्ण वेळ वाहून घेतलेले सावित्रीमाई फुले व जोतिबा फुले हे आदर्श दाम्पत्य होते. “, असे प्रतिपादन केले.
या कार्यक्रमाचे आयोजन महात्मा ज्योतिबा फुले विचार मंचचे रविंद्र चव्हाण व विलास माने यांनी केले होते. या वेळी संभाजी ब्रिगेडचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सतिश काळे यांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सूत्रसंचालन विलास माने तर आभार किरण खोत यांनी मानले यावेळी सुरज पाटील, महेश जगताप, सुधिर पवार , नितीन गायकवाड, रमेश तुपे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.