हेमंत पाटील (कराड)
कराड -आंबेडकरी विचार, चळवळीने वंचित शोषित समाज घटकांना आत्मभान देणाऱ्या, जगण्यासाठीचा संघर्ष अन त्यासाठीची ताकद देणाऱ्या आणि ‘भीमाची वाघीण ‘ अशी ओळख असलेल्या बनुबाई येलवे यांचे कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये रविवारी रात्री 2 वा. त्यांचे निधन झाले. सामाजिक कार्याचा वसा जपणाऱ्या, वंचित, उपेक्षितांच्या न्यायासाठी लढणाऱ्या शेरे (ता.कराड) येथील बनुबाई येलवे यांचे निधन झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. सर्वसामान्य कुटुंबातील बनूबाई ह्या अनेक वर्षांपासून गोरगरीबांसाठी काम करत होत्या. अडचणीत असणारांच्या मदतीसाठी धाऊन येणाऱ्या बनूबाईमध्ये समाज कार्याची तळमळ पहायला मिळायची.
हातात निळा झेंडा घेतलेल्या बनुबाईंनी अनेक अन्याय-अत्याचारग्रस्त लोकांना न्याय मिळवून दिला.अनेक विधवांना शासकीय पेन्शन मिळवून दिली,नवरा नांदवत नसलेल्या स्त्रियांचा संसार पुन्हा उभा करून दिला,शासकीय स्वस्त धान्याचा प्रश्न असो किंवा विद्यार्थ्यांच्या अनेक दाखल्याचा प्रश्न असो,त्यांनी तो लोकशाही पद्धतीने आंदोलन करून सोडवला. बनुबाई येलवे नावाचा आंबेडकरी विचारांचा कृतीशील झंझावात अनेक दशके कराड परिसरात वादळासारखा फिरत राहिला. अक्षरओळख नसलेल्या बनुबाई स्वतःवर झालेल्या अन्याय अत्याचारानंतर पेटून उठल्या. याला तोंड द्यायचं असेल तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशिवाय पर्याय नाही हे त्यांनी जाणले.वाचता-लिहिता येत नाही म्हणून त्या निराश झाल्या नाही. अनेक विचारवंत लोकांची भाषणे त्यांनी ऐकलेली होती, बाबासाहेबांचा वैचारिक आणि कृतिशील संघर्ष अनेक भाषणातून त्यांनी ऐकलेला होता. याच विचाराचा वारसा घेऊन त्यांनी गरजु, गरीब आणि अन्यायग्रस्त लोकांची मदत करत आपला लढा सुरु केला.बनुबाई यांनी लोकांच्या प्रश्नावर अनेक मोर्चे काढून सर्वसामान्य लोकांना न्याय मिळवून दिला. तसेच भ्रष्ट तलाठ्याच्या गळ्यात चपलाचा हार घालण्याचे धाडसी कृत्य बनुबाई यांनी केले होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अनुद्गार काढणाऱ्या शालिनी पाटील यांच्या चेहऱ्याला काळे फासण्याचे आंदोलन बनुबाई यांनी केले.याबरोबरच नदीतील वाळू उत्खननाचे दुष्परिणाम प्रशासनाला कळावे म्हणून त्यांनी एकदा तहसीलदार कराड यांच्या दालनात मृत मासे आणून टाकले होते. रेशन दुकानात मिळणारे निकृष्ठ धान्य अनेकदा बनुबाइनी त्या कार्यालयात अधिकाऱ्याच्या समोर आणून हे पहिल्यांदा तुम्ही खावे, अशी भूमिका घेतलेली होती. राज्यात कुठेही जातीय अत्याचार झाला कि त्यांचा मोर्चा ठरलेला असे. जातीय अत्याचाराच्या घटना घडल्या की, त्या प्रत्यक्ष तिथे भेट देत असत. त्यांनी रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचे काम केले. रिपाइ नेते रामदास आठवले यांच्याशी त्यांचे सोख्यपुर्न संबंध होते.
प्रशासन अधिकाऱ्यानी लोकांचे म्हणणे ऐकले नाही कि त्या थेट कार्यालयात धिंगाणा करायच्या. बनुबाई येलवे आपल्या कार्यालयाच्या आवारात आल्या की अधिकाऱ्याना धडकी भरायची. एकदा शालेय विद्यार्थ्यांना जातीचे दाखले मिळत नव्हते. अधिकारी कार्यालयात त्यांची दाद घेत नव्हते. बनुबाई कार्यालयाबाहेर आल्या आणि त्यांनी जोरजोरात बोंब ठोकायला सुरवात केली. दाखले मिळेपर्यंत मी थांबणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतला. अधिकाऱ्यानी बाहेर येऊन तात्काळ दाखले देण्याची व्यवस्था केली. अशा प्रकारे त्यांनी विविध क्षेत्रात काम केले. महिला केवळ महिला आघाडीच्या नेतृत्व करतात पण बनुबाईनी यांचे नेतृत्व कामातून तयार झाले. सर्वच आघाड्यांवर त्यांनी नेतृत्व केले. त्यांनी आवाज देताच शेकडो महिला रस्त्यावर यायच्या. अशा प्रकारे बनुबाई येलवे यांची भीमाची वाघीण अशी ओळख होती.