वाघोली – ‘राष्ट्रीय एकात्मतेसाठी धर्मसहिष्णुता आणि सामाजिक समता टिकवून ठेवणे गरजेचे आहे.’ असे मत संमेलनाध्यक्ष प्रा. प्रदीप कदम यांनी धर्ममैत्री विचारवेध साहित्य संमेलनात व्यक्त केले. राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद व वाघोली येथील भारतीय जैन संघटनेचे कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयातील मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने तेरावे धर्ममैत्री विचारवेध संमेलन संपन्न झाले.संमेलनाचे उद्घाटन डॉ. अशोक पगारिया यांच्या हस्ते झाले.
याप्रसंगी बीजेएस प्रकल्प व्यवस्थापक श्री.सुरेश साळुंके, शंकर आथरे यांनी मार्गदर्शन केले. संमेलनाची सुरुवात धर्ममैत्री प्रबोधन यात्रा आणि ग्रंथदिंडीने झाली.
राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषदेचे अध्यक्ष बंधुताचार्य प्रकाश रोकडे यांनी, ‘थोर समाजसुधारकांनी समाजाला माणुसकीची शिकवण दिल्यामुळे समाज मानवतावादाकडे जाऊ लागला, आजही त्या महापुरुषांचे विचार समाजपरिवर्तनाच्या दृष्टीने प्रेरणादायी आहेत. असे मत समारोप प्रसंगी व्यक्त केले.
या प्रसंगी शंकर आथरे यांच्या ‘बंधुतेचे विस्तीर्ण क्षितिज’, मधुराणी बनसोड यांच्या ‘सन्मार्ग’ काव्यसंग्रह तर डॉ. सिद्धेश्वर गायकवाड यांच्या ‘मराठी नाटकों के हिंदी रुपांतरण का अनुवादपरक अनुशीलन’ या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. कवी चंद्रकांत वानखेडे, मधुश्री ओव्हाळ, डॉ. बंडोपंत कांबळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगिता झिंजुरके तर आभार डॉ. सहदेव चव्हाण यांनी मानले. कार्यक्रमाचे आयोजन मराठी विभागाने केले.