सणसवाडी (ता. शिरूर) येथील काळूबाई नगर येथे मंगळवारी पहाटेच्या सुमारास हॉटेलला आग लागून हॉटेलसह शेजारील बेकरी जळून खाक झाली. यामध्ये हॉटेलमधील टेबल, खुर्चा, फ्रीज, भांडी, किराणा सामान, भाजीपाल्यासह शेजारी बेकरीमधील साहित्य जळाल्याने आठ लाख रुपयांचे नुकसान झाले.
काळूबाई नगर येथे दौलत हॉटेल असून २९ एप्रिल रोजी अनंत डापकर हे हॉटेल बंद करुन घरी गेले होते. मंगळवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास डापकर यांच्या दौलत हॉटेलमधून धूर येत असल्याचे शेजारील नागरिकांना दिसले तसेच शेजारील बेकरीलाही आगीने वेढा घातला होता. याबाबत माहिती मिळताच शिक्रापूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली तातडीने अग्निशामक पाचारण करण्यात आले.यावेळी पोलिसांनी स्थानिक नागरिकांसह पुणे महानगर प्राधिकरण विकास महामंडळ वाघोली येथील अग्निशामक दलाच्या मदतीने आगीवर नियंत्रण आणले; परंतु आगीने रौद्ररुप धारण केल्याने हॉटेलमधील टेबल, खुर्चा, फ्रीज, भांडी, किराणा सामान, भाजीपाल्यासह शेजारी बेकरीमधील सर्व साहित्य जळून खाक झाले.बाजूचा पत्रा उचकाटावून आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले.
यावेळी शिक्रापूर पोलीस स्टेशनचे कर्मचारी व वाघोली अग्निशमन दलाचे अल्ताफ पटेल, मयूर गोसावी,महेश पाटील,उमेश फाळके व पवार यांच्यासह स्थानिक नागरिकांनी आग नियंत्रणात आणण्याचे कार्य केले.