सणसवाडी (ता.शिरुर ) गावच्या हद्दीत गट.न ९४८ मध्ये असणाऱ्या चॅम्पियन शुगरकेन इनफिल्डर अँड ट्रेलर कंपनीचे पत्र्याच्या शॉपचे शटरचे लॉक ग्राइंडरने तोडत कंपनीमध्ये शिरुन शुगर केन इन्फिल्डर मशीन व इतर मटेरियल असा एकूण ३७ लाख ६४ हजार ६५५ रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना (दि १३ जून) रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
याबाबत बाबासाहेब दादासाहेब निमसे (वय४९,रा. इकोग्राम सोसायटी, शिक्रापूर) यांच्या फिर्यादीवरून हरीश बाळासाहेब शिंदे,(रा.बीड शहर,बीड) व त्याच्या सोबत असणाऱ्या तीन अनोळखी इसमांवर शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिक्रापुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बाबासाहेब निमसे यांची स्वतःच्या मालकीची ‘चॅम्पियन शुगर केन इन्फिल्डर अँड ट्रेलर’ नावाची सणसवाडी मध्ये कंपनी आहे. या कंपनीमध्ये ‘शुगर केन इन्फिल्डर आणि ट्रेलर’ तयार होतात. निमसे यांच्याकडे दोन वर्षांपूर्वी दि १६ नोव्हेंबर २०२२ रोजी हरीश बाळासाहेब शिंदे या इसमाने फिर्यादी यांच्याशी संपर्क करुन दोन शुगरकेन इन्फिल्डर मशीन बनवण्यास सांगितले. सदर दोन्ही मशीनची किंमत १७ लाख ५० हजार रुपये व जीएसटी ३ लाख १५ हजार रुपये असे एकूण २० लाख ६५ हजार रुपये अशी होती. त्यापैकी हरीश शिंदे यांनी फिर्यादी निमसे यांना १७ लाख ५० हजार रुपये दिले व जीएसटी चे ३ लाख १५ हजार रुपये शिल्लक ठेवले. त्यावेळी हरीश शिंदे हा १ शुगरकेन इन्फिल्डर मशीन घेऊन गेला. फिर्यादी यांनी दुसरे १ शुगर केन इन्फिल्डर मशीन तयार झाल्यानंतर तुम्ही दोन्ही मशीनचे एकूण जीएसटी बिल ३ लाख १५ हजार रुपये भरा असे सांगितले.
त्यानंतर दि १५ डिसेंबर २०२२ रोजी हरीश शिंदे हा फिर्यादी निमसे यांच्या कंपनीमध्ये येऊन मी जीएसटी चे बिल ३ लाख १५ हजार रुपये भरणार नाही. सदर मशीन हे शेती उपयुक्त आहे. त्यास जीएसटी लागत नाही. मला माझा जॉन डीअर ट्रॅक्टरला जोडून तयार केलेले शुगर केन इन्फिल्डर मशीन द्या असे म्हणाला. त्यानंतर फिर्यादी यांनी तुम्ही जीएसटी बिल भरुन तुमचा ‘जॉन डीअर ट्रॅक्टर व इन्फिल्डर मशीन’ घेऊन जा असे सांगितले. त्यावेळी शिंदे याने फिर्यादी यांच्याशी वाद केला अन निघून गेला.
त्यानंतर दि १३ जुन २०२४ रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी निमसे यांच्या सणसवाडी गावच्या हद्दीत असणाऱ्या कंपनीतुन पत्र्याच्या शॉपचे शटरचे लॉक ग्राइंडरने तोडुन हरीश बाळासाहेब शिंदे व त्याच्यासोबत असलेल्या ३ अनोळखी लोकांनी कंपनीमध्ये शिरुन त्याचा जॉन डीअर ट्रॅक्टर तसेच फिर्यादी यांच्या कंपनीतील शुगरकेन इन्फिल्डर मशीन व इतर बरेच मटेरियल असा एकूण ३७ लाख ६४ हजार ६५५ रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला असल्यामुळे त्यांच्यावर शिक्रापुर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल झाला असुन पोलिस पुढील तपास करत आहेत.