दुचाकी व स्कॉर्पिओ चालकावर गुन्हा दाखल
वाघोली (ता.हवेली) रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगाने आलेल्या दुचाकी व स्कॉर्पिओ कार ने बारा वर्षाच्या मुलाचा गंभीर जखमी होऊन मृत्यु झाल्याची घटना वाघोली- आव्हाळवाडी रोडवरील विठाई वेअर हाउस समोर रविवारी (दि.१६) दुपारी बाराच्या सुमारास घडली. याप्रकरणी दुचाकी व स्कॉर्पिओ चालकावर लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मानस अभिजित पवार (वय १२ रा. वृंदावन सोसायटी, आव्हाळवाडी) असे अपघातात मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी प्रवीण पवार यांच्या फिर्यादीवरून स्कार्पिओ क्र. एम एच १२ व्ही एक्स ७९७९ चे चालक गणेश बाबुराव फड (वय ३५, रा. मांजरी खू.) व अनोळखी दुचाकी एम एच १२ क्यू पि ०७३४ चे चालक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहिती नुसार, रविवारी (१६ जून) दुपारी १२ वाजेच्या सुमारास प्रवीण पवार हे रस्त्याच्या बाजूला उभे असताना त्यांचे भाडेकरी अभिजित पवार यांचा मोठा मुलगा मानस हा राधे मधुर स्वीट होम मधून ब्रेड व इतर सामान घेवून वाघोली-आव्हाळवाडी रोड येथे पायी रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगाने आलेल्या दुचाकी व स्कॉर्पिओ कार ने जोराची धडक दिली. यामध्ये मानस हा गंभीर जखमी झाल्याने मृत्यू झाला. अपघात होताच दुचाकी स्वार दुचाकी सोडून पळून गेला. लोणीकंद पोलिसांनी स्कार्पिओ गाडीच्या चालकासह अपघातग्रस्त स्कार्पिओ कार व दुचाकी ताब्यात घेतली आहे. पुढील तपास लोणीकंद पोलीस करत आहेत.