शिरूर – अजित पवार हे फार मोठे नेते आहेत. मी फार छोटा कार्यकर्ता आहे. मला दम देण्यापेक्षा अजित पवारांनी कांद्याला चांगला बाजार द्यावा. दुधाचे दर वाढवुन द्यावेत. मी शरद पवार साहेबांवर प्रेम करणारा कार्यकर्ता आहे.मी साहेबांसोबत गेलो म्हणुन जर तुम्ही या थराला जात असाल तर ते योग्य आहे का…? हे जनता ठरवेल असं प्रत्युत्तर आमदार अशोक पवार यांनी अजित पवारांना दिलं.
घोडगंगा साखर कारखान्याच्या संदर्भात बोलताना अशोक पवार म्हणाले, मागच्या वर्षी घोडगंगा साखर कारखान्याने 55 कोटी शॉर्ट टर्म (ST Loan) कर्ज घेतलं, ते सर्व कर्ज भरल. त्यानंतर आम्हाला नवीन कर्ज मिळणार होत. शिवाय या सरकारने सहा कारखान्यांना थकहमी दिली, राज्य बँकेचं कर्ज दिलं. तर काहींना NCDC चं कर्ज दिलं. आम्ही पण त्या प्रतिक्षेत होतो की त्यांच्यासारख आम्हाला पण कर्ज द्यावं. कारण आमचं खात NPA मध्ये नसल्याने आमचं खात व्यवस्थित होत.जर जुन-जुलै महिन्यात कारखान्याचा एक रुपया थकीत नव्हता. तर आमचं कर्ज का अडवलं…? असा प्रश्न अशोक पवारांनी उपस्थित करत आम्ही वेळोवेळी विनंती करत असताना आम्हाला कर्ज देण्यास टाळाटाळ केली. परंतु राजकारण बदलल्याने मी शरद पवारांसोबत गेलो म्हणुन हि अडवणूक झाली का…? असं आम्हाला वाटायला लागलं.
शरद पवार साहेबांना मी पित्याच्या जागी मानतो त्यांचं स्थान हृदयात– शरद पवार साहेबांना मी पित्याच्या जागी मानतो. ते माझ्या हृदयातल स्थान आहे. मंत्रीपद सोडा मला पवार साहेबांनी पुन्हा आमदारकीचं तिकीट दिलं नाही. तरी मला काहीच अडचण नाही. मला साहेबांसोबत राहायचं आहे हे मी जाहीर सभेत सांगितलं. सन १९७६ माझ्या कॉलेज जीवनापासुन मी पवार साहेबांवर नितांत प्रेम करणारा कार्यकर्ता आहे. मी माझी निष्ठा का सोडू असेही ते म्हणाले. त्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्त्यांना अजित पवार यांनी अशी दमबाजी करणे योग्य नसल्याचे पवार म्हणाले.
शिरुर मतदारसंघात महायुतीचे उमेदवार आणि राष्ट्रवादीचे नेते आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ सभा घेताना अजित पवारांनी आमदार अशोक पवार यांनी शरद पवारांची साथ का दिली, यावर भाष्य केलं. “दिलीपराव वळसे पाटलांचा शपथविधी झाला की, याची सटकली. हा म्हणाला दादांनी याला मंत्रीमंडळात घ्यायला नको होते. आता आपलं काही जमणार नाही. त्यांच्या डाव्या आणि उजव्या बाजूला बसलेल्या आमदारांना त्यांनी सांगितलं. मला त्या आमदारांनी घरी आल्या आल्या सांगितले की, तो असं म्हणत होता आणि नंतर तो तिकडे गेला. त्याला गाजर दाखवण्यात आलं आहे. त्याला साहेबांनी सांगितलं की, पुढच्या वेळेस तूच मंत्री होणार आहेस. आता पुढच्या वेळेस मंत्री होण्यासाठी त्याने कारखान्याची वाट लावली, बाकीच्या सगळ्यांची वाट लावली. आता मंत्री व्हायला निघालायस, पठ्ठ्या तू आमदार कसा होतो तेच बघतो”, असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरुरचे आमदार अशोक पवार यांना आव्हान दिले आहे.