पुणे – पुण्यात काळीज हेलावून टाकणारा भीषण अपघात पुण्यात घडला असून भरधाव डंपरने एका दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की दुचाकीवर बसलेल्या महिलेच्या धडापासून शीर वेगळे झाले.या अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला. या महिलेची सून गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना बुधवारी साडेबाराच्या सुमारास मार्केट यार्ड येथील गंगाधाम रस्त्यावर घडली.
चिडलेल्या नागरिकांनी डंपर चालकाला पकडून बेदम चोप देत पोलिसांच्या हवाली केले. हा डंपर वाळू घेऊन बिबवेवाडी येथील ईसीएच रुग्णालयाकडे निघाला होता. दमयंती भूपेंद्र सोळंकी (वय ५९, रा. कुमार पृथ्वी, बिबवेवाडी-कोंढवा रस्ता) असे मृत्यूमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. त्यांची सून प्रियंका राहुल सोळंकी (वय ३३) या गंभीर जखमी झाल्या आहेत. याप्रकरणी डंपर चालक अशोक छोटेलाल महतो (वय ३७, धंदा चालक, सध्या रा. बावधन बुद्रुक ) याला ताब्यात घेतले आहे. मार्केट यार्ड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राहूल खिलारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दमयंती सोळंकी आणि प्रियंका सोळंकी या दोघी सासू-सूना आहेत. दमयंती यांना दोन मुले असून दोघेही विवाहित आहेत. त्यांचा एक मुलगा राजस्थान येथे राहण्यास आहे. या दोघी बुधवारी दुपारी खरेदीसाठी मार्केट यार्ड येथे दुचाकीवरुन निघाल्या होत्या. प्रियंका दुचाकी चालवीत होत्या. तर, दमयंती पाठीमागे बसलेल्या होत्या.
कुमारपृथ्वी सोसायटीमधून निघाल्यानंतर मार्केट यार्डच्या दिशेने त्या जात होत्या. आईमाता मंदिरापासून सुरू होणाऱ्या उतारावरून या दोघी गंगाधाम चौकाकडे जात होत्या. उतार संपल्यानंतर असलेल्या अग्निशामक दलाच्या केंद्रासमोरच त्यांना पाठीमागून भरधाव आलेल्या डंपरची धडक बसली. चालकाचे या डंपरवरील नियंत्रण सुटले होते. त्याने या दोघींना ५० ते ६० फुट पुढे फरफटत नेले. डंपरचे चाक दमयंती यांच्या मानेवरून गेले. तसेच त्यांचे शरीर पुढे चाकासोबत फरफटत गेल्याने त्यांचे शीर धडावेगळे झाले. नागरिकांनी आरडाओरड केल्यानंतर चालकाने गाडी थांबवली. चालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, नागरिकांनी त्याला पकडून बेदम चोप दिला. चिडलेल्या नागरिकांनी रागाच्या भरात डंपरवर दगड मारून काचा फोडल्या. महिलेचे शरीर छिन्न विछिन्न अवस्थेत पडलेले होते. नागरिकांनी तात्काळ महिलेच्या अंगावर कापड झाकले.