Tuesday, July 16, 2024
Homeइतरधक्कादायक! शिरुर तालुक्यात दहिवाडी येथे वन्य प्राण्याच्या हल्ल्यात १० वर्षीय मुलाचा मृत्यू

धक्कादायक! शिरुर तालुक्यात दहिवाडी येथे वन्य प्राण्याच्या हल्ल्यात १० वर्षीय मुलाचा मृत्यू

अधिकारी म्हणतात बिबटया की अन्य वन्यप्राणी याबाबत खात्री नाही…

 शिरुर तालुक्यातील दहिवडी गावच्या मांजरेवस्ती शिवारात शुक्रवार (दि २१) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास बिबट्याने केलेल्या हल्ल्यात यश शरद गायकवाड (वय १०) मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. परंतु हा हल्ला बिबट्यानेचं केलाय की अन्य वन्यप्राण्याने केलाय याबाबत खात्रीलायक माहिती उपलब्ध झालेली नसुन यश गायकवाड याचा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे खरे कारण समोर येईल अशी माहिती शिरुरचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रताप जगताप यांनी दिली. 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार यश हा शुक्रवार (दि २१) रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घराच्या मागील बाजूस शौचास गेला असता. तिथेच गवतात दबा धरुन बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला व उसाच्या शेतात ओढत घेऊन गेला. बराच वेळ झाला तरी शौचास गेलेला मुलगा येईना म्हणून घराच्या पुढील बाजूस शेतात काम करणाऱ्या यशच्या कुटुंबीयांनी शोधाशोध चालू केली. बराच वेळ शोध घेतल्या नंतर तेथील उसामध्ये पाहिले असता विचित्र अवस्थेत यश चा मृतदेह आढळून आला. सदर घटनेची माहिती वनविभागाला कळविल्यानंतर वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले .

या घटनेनंतर दहिवडी परिसरात ग्रामस्थांचा मोठा उद्रेक झाला असुन बिबट्याचे हल्ले थांबविण्यासाठी वनविभाग तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी यावेळी ग्रामस्थ करत आहेत. तीन चार दिवसांपूर्वीच पारोडी, इंगळेनगर येथे बिबट्याने  केलेल्या हल्ल्यात मेंढ्या मृत्युमुखी पडल्याची घटना ताजी असतानाच ही घटना घडली. या परिसरात वारंवार बिबट्याचे दर्शन होत असते वेळोवेळी वन विभागाला याबाबत माहिती देण्यात आलेली होती. तरीही वनविभागाने कुठलेही ठोस पाऊल उचलले नाही. यास वनविभाग जबाबदार आहे. असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.

प्रथम दर्शनी हा बिबट्याचा हल्ला वाटत नाही. आम्ही ससून रुग्णालयात शवविच्छेदन केलेले आहे. त्याचा अहवाल येण्यासाठी आठ ते दहा दिवस लागतील. त्यामुळे तूर्तास तरी हा बिबट्याचा हल्ला आहे किंवा अन्य कोणत्या वन्यप्राण्याचा हल्ला आहे हे शवविच्छेदनाचा अहवाल आल्यावरच समजेल. – प्रताप जगताप, वनपरिक्षेत्र अधिकारी, शिरुर 

दरम्यान बिबट्याला पकडण्यासाठी दहिवडी येथे पिंजरा लावावा अशी मागणी वनविभागाला केली होती. याआधी परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे खुप वेळा दिसले होते. वनविभागाने बिबट्याच्या हल्ल्याचे प्रमाण रोखण्यासाठी उपाय करणे गरजेचे आहे. – जालिंदर पवार (पोलीस पाटील ,दहिवडी)

शेतीला पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळीदेखील शेतात जावे लागते. यावर उपाय करणे गरजेचे. बिबट्याच्या भीतीमुळे ग्रामस्थ भयभीत झालेले आहेत. बिबट्याची दहशत अजून किती दिवस सहन करावी लागणार. – स्थानिक शेतकरी

बातमी अपडेट होत आहे.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!