Tuesday, July 16, 2024
Homeक्राइमधक्कादायक ! पुण्यात फुरसुंगी येथे घरातून निघून गेलेल्या२५ वर्षीय महिलेचा मृतदेह...

धक्कादायक ! पुण्यात फुरसुंगी येथे घरातून निघून गेलेल्या२५ वर्षीय महिलेचा मृतदेह आढळला पाण्याच्या टँकरमध्ये

पुणे -घरामधून निघून गेलेल्या एका महिलेचा मृतदेह पाण्याच्या टँकरमध्ये आढळून आल्याची घटना गुरुवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास उघडकीस आली. फुरसुंगी येथील पॉवर हाऊसजवळ पाणी सोडत असताना हा प्रकार समोर आला.(Pune Crime News)थेट पाण्याच्या टँकरमध्ये मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. हा खून आहे की आत्महत्या याबाबत पोलिसांकडून तपास केला जात आहे. (Crime News)

कौशल्या मुकेश चव्हाण  (वय २५, रा. दुगड चाळ, जेएसपीएम कॉलेज जवळ, हांडेवाडी) असे या महिलेचे नाव आहे. कोंढवा पोलीस ठाण्यात  ही महिला हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संतोष पांढरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुरुषोत्तम नरेंद्र ससाणे (वय २७, रा. दुगड चाळ, हांडेवाडी) यांचा पाण्याचा टँकरचा व्यवसाय आहे. बुधवारी दिवसभर पुण्याच्या विविध भागात टँकरने पाणी पोचवल्यानंतर रात्री साडेनऊच्या सुमारास त्यांनी घराजवळ टँकर उभा केला. त्यानंतर ते घरी गेले. ( Crime News)

गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे त्यांनी टँकर (एमएच १२, डब्ल्यूजे १०९१) बाहेर काढला. त्यानंतर त्यांनी रामटेकडी येथे पाणी भरले. टँकर घेऊन ते फुरसूंगी येथील पॉवर हाऊसजवळ असलेल्या एका घरी पाणी पोचवण्याकरिता गेले. तेथे टाकीत पाणी सोडत असताना पाणीच बाहेर येत नव्हते. त्यामुळे त्यांनी सुरुवातील वॉल्व्ह तपासला. तरी देखील पाणी येत नसल्याने त्यांनी पाईप काढून पाहिला असता आतून साडी आल्याचे त्यांना दिसले. साडी कुठून आली हे पाहण्यासाठी ते टँकरवर चढले. टँकरचे झाकण उघडून पाहिले असता आतमध्ये कौशल्या यांचा मृतदेह पाण्यामध्ये आढळून आला. त्यांनी तात्काळ याबाबत पोलिसांना माहिती कळवली. हडपसर पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत हा मृतदेह बाहेर काढला. पंचनामा करीत हा मृतदेह ससून रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला. (Pune City Police)

महिलेचा मृतदेह टँकरमध्ये आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ही महिला नेमकी कोणत्या कारणामुळे घरामधून गायब झाली होती यांचा शोध घेतला जात आहे. तसेच, हा खून आहे की आत्महत्या याबाबत स्पष्टपणे काहीही सांगता येत नसून शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर ते स्पष्ट होऊ शकेल असे निरीक्षक संतोष पांढरे म्हणाले.(Hadapsar police station)

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!