दिवेघाटामध्ये सासवडहून हडपसरच्या दिशेने येणाऱ्या एसटीचा घाटाच्या चौथ्या वळणावर अपघात झाला. डोंगराच्या बाजूला असणाऱ्या रस्त्यालगतच्या चारीमध्ये एसटी गेल्याने अपघात झाला.सुदैवाने कोणालाही दुखापत व जीवितहानी झाली नाही.
आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास डोंगराच्या बाजूला एका चारीत एसटी गेल्याने एसटी मधील प्रवाशांना दरवाजातून खाली उतरता येत नव्हते. अपघात झाल्यावर चालक भीतीने तेथून पळून गेल्याचे प्रवाशांनी सांगितले. तेथून जाणाऱ्या नागरिकांनी व एसटीतील प्रवाशांनी एकमेकांना मदत करत एसटी मधील प्रवाशांना खिडकीतून बाहेर काढले. या एसटीमध्ये सुमारे ४० प्रवासी प्रवास करत होते.
दुपारी एकच्या सुमारास सासवडहून हडपसरच्या दिशेने एसटी येत होती. यावेळी चालकाचा निष्काळजीपणाने एसटी चारीत गेल्याचे प्रवाशांनी सांगितले. एसटीतील प्रवाशी घाबरले होते. मात्र घाटातून जाणाऱ्या नागरिकांनी त्यांना बाहेर काढले. सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही.