तळेगाव ढमढेरे – शिरूर तालुक्यातील आरणगाव आणि जातेगाव या गावांमध्ये गेल्या काही दिवसांत जबरी चोरीच्या घटना घडल्या होत्या. त्यामधे चोरांनी केलेल्या मारहाणीत ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटना घडल्या आहेत. गावागावांमध्ये खबरदारीचा उपाय म्हणून आणि चोरीला आळा बसावा यासाठी शिक्रापूर पोलिस ठाण्याअंतर्गत गावांमध्ये ग्रामसुरक्षा ॲक्टिव मोड मध्ये आला आहे. त्या संदर्भात पोलिस पाटील, ग्रामपंचायत प्रशासन, ग्रमसुरक्षा दल यांच्या बैठका घेऊन बीटअंमलदार कडून मार्गदर्शन करण्यात आले आहे.
तळेगाव ढमढेरे (ता.शिरूर) या परिसरात पोलिसांनी विवीध गावांमध्ये जाऊन बैठका घेतल्या आहेत. ग्रामसुरक्षा दलात काठी, शिट्टी, टी शर्ट आदी वस्तूंचे वाटप करणार असल्याचे सांगितले आहे. ग्रामसुरक्षा दल स्थापन झाल्यानंतर ग्रामसुरक्षा दलातील सदस्यांनी रात्रीची गस्त घालत गावाची सुरक्षा करावयाची आहे. गावाच्या सुरक्षा उपाय म्हणून गावातील लोकांनी एकत्र येऊन रात्रीच्या वेळी गस्त घालावी. तसेच युवकांना ग्राम सुरक्षा दलात संधी देण्यात येणार असून सर्व गावातील तरुणांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन बीट अंमलदार किशोर तेलंग यांनी केले.
पोलिस स्टेशन परिसरातील तळेगाव ढमढेरे, दहिवडी, टाकळी भिमा, विठ्ठलवाडी, निमगाव म्हाळुंगी, कासारी या भागात जाऊन गावातील पोलिस पाटील, ग्रामपंचायत प्रशासन, ग्रमसुरक्षा दल यांच्या बैठका घेऊन पोलिस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली बीटअंमलदार किशोर तेलंग यासकडून मार्गदर्शन करण्यात आले आहे. यावेळी ग्रामपंचायत दहिवडी सरपंच सुवर्णा नेटके, उपसरपंच पल्लवी गारगोटे, ग्रामपंचायत सदस्य संतोष दौंडकर, ग्रामपंचायत सदस्य मंगल उकले, पोलीस पाटील जालिंदर पवार,तंटामुक्ती अध्यक्ष राजेंद्र ढमढेरे, ग्रामपंचायत सदस्य मनीषा ढमढेरे व ग्रामसेवक जितेंद्र साळुंके हे उपस्थित होते.