
प्रतीक मिसाळ सातारा
सातारा – सातारा शहराच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या क्षेत्रासाठी ४८ कोटी रुपयांचा आराखडा नगर विकास विभागाने मंजूर केला असून, या कामांना लवकरच सुरुवात करण्यात येणार आहे, अशी माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. सातारा नगरपरिषदेच्या हद्दीत समाविष्ट झालेल्या भागाच्या विकासासाठी सातारा नगरपरिषदेने सादर केलेल्या ४८ कोटींच्या प्रस्तावास मंजूरी मिळाली आहे .
या निधी पैकी पहिला हप्ता लवकरच नगरपरिषदेला प्राप्त होईल , अशी माहिती सातारा विकास आघाडीचे अध्यक्ष खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली . याकामी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची उदयनराजे भोसले यांनी समक्ष भेट घेवून पाठपुरावा केला होता . गत महिन्यात ५८ कोटी रुपयांच्या प्रशासकीय इमारतीस मंजूरी मिळुन , पैकी १० कोटींचा पहिला प्राप्त झाला होता . आज ४८ कोटींच्या हद्दवाढ भागातील कामांना मंजूरी मिळाली आहे . राज्यशासनाकडून याकामी ४८ कोटींच्या प्रस्तावास मंजूरी मिळाली आहे . लवकरच यापैकी पहिल्या हप्त्याचा निधी नगरपरिषदेस प्राप्त होणार आहे . हद्दवाढ भागाचा समतोल विकास साधताना , बचतगटांच्या माध्यमातुन महिला सक्षमीकरण , रोजगार निमिर्ती , बाग – बगिचे आणि उद्याने विकसित करणे , दर्जेदार रस्ते – गटर्स , पाईपड्रेन , स्ट्रीट लाईटस् इ . कामांबरोबरच शाश्वत विकासाची कामे मार्गी लावण्यात येतील . मंजूर हद्दवाढ विकास प्रकल्पानुसार प्रशासकीय कार्यवाही करुन , लवकरच कामांना सुरुवात करण्यात येणार असल्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी सांगितले . हद्दवाढ भागातील नागरिकांना दर्जेदार सुविधा मिळाल्या पाहिजेत ही आमची समाजकेंद्रीत धारणा आहे . आमच्या या प्रयत्नांना यश आले आहे , अशी प्रतिक्रीयाही खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केली.