शेजाऱ्यांच्या तातडीच्या मदतीने सुदैवाने कुटुंब वाचले मात्र कुटुंबातील गोविंद थोरात यांच्या हाताला गंभीर जखम तर कुटुंबाच्या संसाराची झाली राखरांगोळी
बीड – भाजीपाल्याचा व्यवसाय करणाऱ्या एका व्यापाऱ्याला कुटुंबासह पेट्रोल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना बीड जिल्ह्यात समोर आली आहे. बीडच्या (Beed) केज तालुक्यातल्या ढाकेफळ येथे ही घटना घडली असून शेजाऱ्यांच्या तत्परतेने कुटुंबाचे प्राण वाचले असून यामध्ये गोविंद थोरात यांच्या हाताला गंभीर जखम झाली असून सुदैवाने कुटुंब वाचले आहे मात्र, या आगीत थोरात कुटुंबाच्या संसाराची राखरांगोळी झाली आहे.

याप्रकरणी युसूफ वडगाव पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोविंद थोरात असं या व्यापाऱ्याचे नाव असून, त्यांच्यावर पेट्रोल टाकून त्यांना पेटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. यामध्ये थोरात गंभीर जखमी झाले आहे. त्यांच्यावर केजच्या रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. विशेष म्हणजे घराला आग लागल्यावर थोरात यांच्यासह त्यांची पत्नी मुलं देखील आगीत अडकले होते. मात्र, आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांनी तत्परता दाखवत त्यांची आगीतून सुटका करत बाहेर काढले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.
नेमकं काय घडलं? …गोविंद दिलीप थोरात हे आपल्या पत्नी, मुलांसह केज तालुक्यातल्या ढाकेफळ गावातील हनुमान मंदिरा जवळ पत्र्याच्या शेडमध्ये राहतात. सोमवरी ते नेहमीप्रमाणे जेवण करून आपल्या कुटुंबासह झोपी गेले. दरम्यान, अचानक पहाटे अडीच वाजता आगीचे चटके जाणवत असल्याने थोरात यांच्यासह घरातील सर्वच जागी झाले. आगीचा मोठा भडका उडाल्याने एकच खळबळ उडाली. सर्वत्र आरडाओरडा सुरु झाला. थोरात कुटुंबाचा आवाज येऊ लागल्याने शेजारील नागरिक देखील जागी झाले. परिसरातील नागरिकांनी तत्काळ थोरात यांच्या घराकडे धाव घेतली. तसेच, थोरात यांच्या घरांचे पत्रे काढून लहान लेकरांसह सर्वांना सुखरुप घराबाहेर काढले. मात्र, यात थोरात कुटुंबाच्या संसाराची राखरांगोळी झाली आहे. (Crime News)
व्यवसायाच्या वादातून घरावर हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज – गोविंद थोरात हे परिसरातील शेतकऱ्यांचा शेतमाल विकत घेऊन ठोक व्यवसाय करतात. याच व्यवसायायाच्या वादातून त्यांच्या घरावर हल्ला करण्यात आल्याचा आरोप होत आहे. थोरात यांच्या घरासह त्यांच्यावर पेट्रोल टाकून त्यांना जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. यामध्ये त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेत सुदैवाने त्यांचे कुटुंबीय सुरक्षित असून, याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात युसूफवडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. (Crime News)
पेट्रोल टाकत पेटवून देण्याचा प्रयत्न – ढाकेफळ गावातील एका घराला आग लागल्याची माहिती मिळताच युसूफवडगाव पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करत पंचनामा केला आहे. यावेळी घराला आग लावण्यासाठी पेट्रोलचा वापर करण्यात आल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्यामुळे या प्रकरणी अज्ञात लोकांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, आग कोणी लावली, आग लावण्याचे कारण काय? याचा तपास पोलिसांकडून सुरु आहे. मात्र, या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, थोरात कुटुंब प्रचंड घाबरुन गेलं आहे. (Crime News)