
कोरेगाव भीमा – दिनांक २५ फेब्रुवारी
कोरेगाव भिमा ( ता.शिरूर) येथे चिमन दशरथ वाघमारे (वय ६५ वर्षे) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली असून याबाबत दाखल फिर्यादीनुसार –
चिमन वाघमारे यांच्या नवीन घराचे बांधकाम अलअमीन कॉलेजचे जवळ सुरू असून बांधकामासाठी आवश्यक असणारे पैसे महाराष्ट्र बँकेतून काढलेली दोन लाख रुपयांची रक्कम कापडी पिशवीतून घरी घेऊन जात असताना कोरेगाव भिमातील मश्जिदजवळ पाठीमागील मोटार सायकलवरील दोन इसमांनी वाघमारे यांना हाक मारली व तुमचे पैसे पडले आहेत असे सांगितले म्हणुन वाघमारे गाडीवरून खाली उतरून पैसे पडलेल्या ठिकाणी गेले तिथे १० व २० रूपयेच्या नोटा पडलेल्या होत्या परंतू त्या त्यांच्या नव्हत्या म्हणुन ते मोटार सायकलजवळ परत येत असताना पैसे पडल्याचे सांगितलेले मोटार सायकलवरील तेच दोन अज्ञात इसम हे पाठीमागे वळुन येऊन गाडीला अडकवलेली पिशवी घेवुन पुण्याच्या दिशेला पोबारा केला वाघमारे यांनी चोर चोर म्हणून आरडाओरड केली पण तोपर्यंत चोर पळून गेले होते.
सदरची घटना कळताच तात्काळ सहाय्यक फौजदार अविनाश थोरात यांनी गावातील सी सी टी व्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू केले आहे.सदर घटनेचा तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार अविनाश थोरात व पोलीस नाईक संतोष पवार करत आहेत.
दुचाकीवरील चोरटे सोने,चैन,दागिने ,पैशांची बॅग चोरून नेत असल्याच्या घटना शहरामध्ये घडत असताना कोरेगाव भीमा सारख्या गावात ही घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलेला दिसत आहे याबाबत पोलीस प्रशासन कठोर भूमिका घेऊन ग्रामीण भागात येऊ पाहणाऱ्या या गुन्हेगारीला वेळीच आळा घालण्याचा प्रयत्न करेल काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
