ग्रामीण भागातील नोकरदार व विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी प्रशासनाने खेळू नये – माजी उपसरपंच अमित सोनवणे
प्रशासनाच्या भूमिकेने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे आयुष्य अंधःकारमय होण्याची भीती
कोरेगाव भीमा – केंदूर ते मनपा ही पुणे महानगरपालिका परिवहन महामंडळाची ( PMPML) बस सेवा काही कारणास्तव बंद झाली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांचे विशेषतः विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत असून मनपा ते केंदूर बससेवा तातडीने सुरू करण्यासाठी खासदार गिरिश बापट सक्रिय झाले असून त्यांनी पि एम पि एल प्रशासनाला पत्र पटवले आहे. तातडीने बस सुरू करण्यात येईल असे आश्वासन नागरिकांना दिले आहे.
मनपा – केंदुर बस सेवा पुन्हा सुरू व्हावी म्हणून केंदूर, करंदी, वाजेवाडी, वढू गावातील सर्व ग्रामस्थांनी मागणी करत आहेत. ग्रामस्थांची मागणी आणि भावना पुण्याचे खासदार गिरीश बापट यांना पत्र लिहून लक्षात आणून दिली. खासदार बापट यांनी या प्रकरणात स्वतः लक्ष घालून सदर बस सेवा लवकरात लवकर सुरू करावी यासाठी पि एम पि एल एम प्रशासनाला पत्र लिहून मागणी केली तसेच ही बस सेवा लवकरात लवकर पुन्हा सुरू होऊन नागरिकांची गैरसोय होणार नाही असे आश्वासन दिले. वाजेवाडीचे माजी उपसरपंच अमित सोनवणे यांनी जोपर्यंत बससेवा पूर्ववत होत नाही तोपर्यंत पाठपुरावा करणार आहे, प्रसंगी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
मनपा ते केंदूर बससेवा मागील अनेक वर्षांपासून सुरू आहे. बससेवा ही अत्यंत महत्त्वाची असून ही बससेवा बंद करण्यात आल्याने केंदुर, करंदी वाजेवाडी, चौफुला, वढू बुद्रुक येथील विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. शेतकरी,कष्टकरी यांची मुले पुण्यातील महाविद्यालयात शिकत आहे. शिक्षणाची दर्जेदार सुविधा पुण्यात असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थी उज्वल भविष्याच्या दृष्टीने तेथे प्रवेश घेत असतात.पुण्यात राहणे ,तेथे खोली भाडे,खानावळ व दैनंदिन खरच सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थी व पालकांना अशक्य आहे तसेच सकाळी घरून लवकर निघालेली विद्यार्थिनी विद्यार्थिनी या बससेवेमुळे वेळेत महाविद्यालयात सुरक्षित पोचतात पण आता गरिबांच्या लेकरांना शिक्षणापासून वंचित राहावे लागणार की काय असा प्रश्न निर्माण होत आहे .
शिक्षणाचा मूलभूत हक्क आहे ,शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचावी यासाठी शासन प्रयत्न करते आहे पण शिक्षणासाठी प्रवासाचे मुख्य साधन असलेल्या बस सेवा जर उपलब्ध नसेल तर ग्रामीण भागातील शिक्षणापासून विद्यार्थ्यांना वंचित व उपेक्षित राहावे लागते की काय अशी भीती केंदुर , करंदी , चौफुला,वाजेवाडी, वढू बुद्रुक येथील विद्यार्थी व पालकांमध्ये दिसत आहे .
पि एम पि एल च्या बस मध्ये मुलींना शिक्षणासाठी पाठवताना आईवडील निर्धास्त असतात त्यात कॅमेरे व सुरक्षितता मोठ्या असते त्यामुळे विद्यार्थिनींना पुण्यासारख्या ठिकाणी साधारणतः ५० किलोमीटरचा प्रवास करताना सुरक्षितता वाटते.शिक्षणात मुलींना प्राधान्य मिळते. आईवडिलांची मुलींना उच्चशिक्षित करण्याची इच्छा पूर्णत्वास जाते पण बस सेवा बंद झाल्याने विद्यार्थिनी व पालक चिंतेत दिसत आहे.
आता तरी याची जाणीव ठेऊन पि एम पि एल प्रशासन बससेवा पूर्ववत सुरू करून विद्यार्थी व विद्यार्थिनी ,नोकरदार. मोलमजुरी करणारे यांच्या बाबतीत संवेदनशीलता दाखवेल का ?? की झारीतील शुक्राचार्याची भूमिका पार पाडत निगरगट्ट पणा दाखवणार ?? काही नोकरदार वर्ग उदरनिर्वाहासाठी केंदुर व पंचक्रोशीतील नागरिक पुणे परिसरात दररोज प्रवास करतात त्यांना सुरक्षित व परवडणारा प्रवास बंद झाल्याने चाकरमान्यांचे हाल होत असून प्रवासाला जास्तीचा पैसा लागत असून त्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. पी एम पि एल ला आर्थिक नुकसान होत असेल पण ते भरून काढण्यासाठी उपाय योजना ,अनुदान यासारखे उपाय करण्यासाठी प्रयत्न करता येतील पण जर एखाद्या विद्यार्थी – विद्यार्थिनीचे शिक्षण बंद झाले , एखाद्याचा रोजगार गेला तर ते नुकसान कसे भरून काढणार ,त्यांच्या भविष्याच काय ?? याबाबत आता राजकीय नेत्यांनी पि एम पि एल एम प्रशासन व अधिकाऱ्यांसह सामाजिक कार्यकत्यांनी संवेदनशीलतेने करायला हवा.
जपान प्रशासनाची शिक्षणाविषयी संवेदनशीलता – जपान मध्ये कामी-शिराताकी नावाचं एक रेल्वे स्टेशन असून खूप दूरच्या भागात असल्याने इथे ये जा करणारे प्रवासी कमीच, त्यामुळे जपान रेल्वेज या संपूर्ण रेल्वे लाईनला बंद करणार होती. पण तेवढ्यात त्यांना समजलं की ‘काना हाराडा’ नावाची एक लहान मुलगी या ट्रेनचा वापर रोज शाळेत जाण्यासाठी करते. साहजिक आपल्याला एका प्रवाश्यामुळे काही फरक पडणार नाही. पण रेल्वे लाईन बंद झाल्याने मुलीची शाळा बंद पडेल हे जेव्हा जपान रेल्वेजच्या लक्षात आलं, तेव्हा त्यांनी जो निर्णय घेतला तो कौतुक करण्याजोगा होता. त्यांनी असं ठरवलं की जोपर्यंत या मुलीचं शिक्षण पूर्ण होत नाही तोपर्यंत ही रेल्वे बंद होणार नाही. आणि तेव्हा पासून केवळ एक प्रवासी असलेली ही ट्रेन धावत राहिली.
एवढ्यावरच न थांबता जपान रेल्वेने मुलीच्या शाळेच्या वेळेनुसार रेल्वेचं टाईमटेबल तयार केलं. शाळेच्या वेळेनुसार ट्रेनची वेळ बदलत असायची. २०१६ साली काना हाराडाचं शिक्षण जेव्हा पूर्ण झालं आणि तेव्हा पासून ही रेल्वे सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली.एखाद्या देशाच्या सरकारने केवळ एका मुलीच्या शिक्षणाची एवढ्या मोठ्या प्रमाणावर काळजी घ्यावी ही गोष्ट खरंच महान आहे. उद्याच्या उज्वल भविष्यासाठी आता तरी आपण जागरूक होणार की विद्यार्थ्यांच्या भविष्याबाबत मुग गिळून गप्प राहणार .
(अधिक माहितीसाठी – https://en.wikipedia.org/wiki/Kami-Shirataki_Station
)
