
मातृतीर्थ सिंदखेड राजा तालुक्यातील पळसखेड चक्का येथील रहिवासी दुर्गा अरुण धायतडक यांनी त्यांचा भाऊ रमेश नागरे यांना स्वतःचे यकृत दान केले. भाऊबीजेच्या दिवशी यकृताचे यशस्वीपणे प्रत्यारोपण झाले होते.परंतु भावाला जीवदान देणाऱ्या दुर्गाताईने अचानक जगाचा निरोप घेतला. दुर्गाताईच्या निधनाने परिसरात दुःखद शोक व्यक्त करण्यात येत आहे.
देऊळगांव राजा तालुक्यातील अंढेरा येथील रमेश नागरे हे आजारी होते. त्यांना यकृत दान करण्याची गरज होती. त्यांची लहान बहीण दुर्गा धायतडक हिच्याशी त्यांचा रक्तगट जुळला. त्यामुळे दुर्गाताईने भावाला यकृतदान करून बहिणीची जबाबदारी पार पाडली. मुंबईतील खाजगी रुग्णालयात भाऊबीजेच्या दिवशी यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली.
यकृत दान केल्यानंतर दुर्गा धायतडक यांना वैद्यकीय काळजीसाठी मुंबईत राहण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. त्यानुसार दुर्गा धायतडक या मुंबईतच होत्या. काल गुरुवारी (ता. १६) पहाटे त्यांना रुग्णालयात तपासणीसाठी नेले. मात्र सकाळी त्यांची तब्येत अचानक खालावली. डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार सुरू केले.
मात्र उपचार सुरू असताना दुर्गा धायतडक यांची प्राणज्योत मावळली. दुर्गा धायतडक यांच्यावर भावपूर्ण वातावरणात १७ नोव्हेंबर रोजी सकाळी पळसखेड चक्का येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.